जळगाव : जळगाव तालुक्यातील चिंचोली गावातील ११ वर्षीय मुलाचा पोहतांना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना सोमवारी १५ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास धानवड गावाजवळील धरणात घडली आहे. यावेळी नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात एकच गर्दी केली होती. करण जयराम पवार (वय-११) रा. चिंचोली ता.जि.जळगाव असे मृत बालकाचे नाव आहे.
नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, करण पवार हा जळगाव तालुक्यातील चिंचोली गावात आईवडील, भाऊ व दोन बहिणींसोबत वास्तव्याला होता. वडील जयराम सुकराम पवार हे ट्रॅक्टर चालक आहे तर आई सुनिता शेतात जावून आपला उदरनिर्वाह करतात. सोमवारी १५ मे रोजी सकाळी आई व वडील हे शेतात कामासाठी निघून गेले. त्यावेळी चारही भावंडे घरीच होते. दुपारी ४ वाजेच्या सुमारास करण हा गावातील मित्रांसोबत जवळ असलेल्या धानवड गावानजीच्या धरणात पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला पाण्याचा कोणताही अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.
एमआयडीसीएमआयडीसी पोलिसांकडून नोंद
ही बाब सोबत असलेल्या तीन मित्रांना समजल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी धाव घेतली. यावेळी काही पोहणाऱ्या तरूणांनी पाण्यात उडी घेवून करणचा मृतदेह बाहेर काढला. व खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. एमआयडीसी पोलीसांनी जिल्हा रूग्णालयात धावघेवून पंचनामा करण्याचे काम सुरू केले. बालकाचा दुदैवी मृत्यू झाल्याने चिंचोली गावात हळहळ व्यक्त होत आहे. मयताच्या पश्चात आई सुनिला, वडील जयराम सुकराम पवार, मोठा भाऊ आकाश, तसचे कविता आणि दुर्गा या दोन बहिणी असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.