जळगाव: राज्यात काही ठिकाणी पुन्हा उन्हाचा ४० अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात आज तापमान साधारण राहणार असलं तरी खान्देशातील नंदुरबार, धुळे, जळगाव, विदर्भातील सर्व जिल्ह्यांत तसेच मराठवाड्यातील काही भागांत उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. त्यानंतर तापमान २ ते ३ अंशाने घटण्याची शक्यता आहे. १७ मे पासून मात्र वाढणाऱ्या उष्णतेमुळे हालहाल होण्याची शक्यता आहे, हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.
मोचा चक्रीवादळाचा मोठा परिणाम महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. पाऊस जरी गेला असला तरी वाढत्या उष्णतेनं हालहाल होत आहे. १७ मे पासून राज्यात पुन्हा एकदा उष्णता वाढणार असून हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे. मोचा चक्रीवादळ म्यांमारच्या उत्तर-पश्चिमी किनाऱ्यावर धडकलं असून त्यामुळे मान्सूनच्या वाटेत अडथळा निर्माण झाला आहे. मान्सून उशिरा येऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. १५ मे पासून विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णता वाढत असून दोन जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. IMD ने राज्यभरात उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट जारी केला आहे. आयएमडीच्या प्रादेशिक हवामान विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवार, १७ मे पासून महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान 2-3 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे.
गरम हवेमुळे उकाडा वाढला
मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व मराठवाड्यातील उर्वरित काही जिल्ह्यांत ५ दिवसांत कमाल तापमान २ ते ३ अंशांनी घटण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे. मुंबई व कोकणात कमाल तापमान व आर्द्रतायुक्त गरम हवेमुळे उकाडा जाणवत असून ही स्थिती मंगळवारपर्यंत राहू शकते.