जळगाव : जळगाव शहरात लग्नानिमित्त येत असताना फूपणी येथील चौघांना वळणावर सावखेडा- किनोद रस्त्यावर ट्रॅक्टरने जबर धडक दिली. घटना मंगळवारी १६ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील किनोद गावाजवळील सावखेडा फाट्याजवळ घडली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर इतर दुचाकीवरील तिन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
ज्ञानेश्वर रामराव सपकाळे (वय-४१) रा. फुपणी ता.जि.जळगाव असे मयताचे नाव आहे. तालुक्यातील फुपणी येथील रहिवाशी ज्ञानेश्वर सपकाळे हे मंगळवारी १६ मे रोजी दुपारी १ वाजता आपल्या दुचाकीने जळगाव शहरातील रिंगरोडवरील एका सभागृहात आयोजित नातेवाईकाकडील लग्नाला येत होते. त्यांच्यासोबत दुचाकीवर त्यांचा मोठा मुलगा डिगंबर ज्ञानेश्वर सपकाळे (वय-१९), त्यांचे मित्र राजेंद्र रामचंद्र सोनवणे (वय.४८) आणि निलेश शांताराम निकम (वय-४५) हे तिन जण होते. एकाच दुचाकीने फुफणी येथून निघाल्यानंतर किनोद गावाच्या पुढे सावखेडा फाट्यावर सावखेडाकडून येणाऱ्या एका ट्रॅक्टरने वळण रस्त्यावर दुचाकीला जोरदार धडक दिली.
दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
या अपघातात ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या डोक्याला, शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील इतर तिघे गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी त्यांना रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तेथे सीएमओ डॉ. राहुल पाटील यांनी तपासून ज्ञानेश्वर सपकाळे यास मयत घोषित केले. राजेंद्र सोनवणे यांच्या डाव्या हाताला जबर मार लागला असून इतर दोघांनाही मुक्कामार आहे. मयत ज्ञानेश्वर यांचे पश्चात पश्चात पत्नी, तीन मुले, आई असा परिवार आहे. ज्ञानेश्वर सपकाळे हे शेतीकाम करीत उदरनिर्वाह करीत होते. या घटनेबाबत तालुका पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.