मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादीचे दिग्गज मंत्री वर्षा बंगल्यावर दाखल झाले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांच्या जवळचे मंत्री वर्षा बंगल्यावर पोहोचले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे सुद्धा वर्षावर उपस्थित होते. इथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक झाली. त्याचदरम्यान राष्ट्रवादीचे दिग्गज नेते वर्षा बंगल्यावर दाखल झाल्यानंतर तासाभराने स्वत: शरद पवारही वर्षा बंगल्यावर दाखल झाले. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास अडीच तास चर्चा झाली. संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास शरद पवार वर्षा बंगल्यावरुन सिल्व्हर ओककडे रवाना झाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – शरद पवार यांची भेट, महत्वपूर्ण चर्चा..
●महामंडळ वाटप विषय तात्काळ मार्गी लागावा
●कोव्हिड निर्बंधाबाबत अन्य राज्यांना आपण फॉलो करावे, कारण सततच्या निर्बंधामुळे सर्वसामान्य जनतेत आणि व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. राज्याची आर्थिक घडीही विस्कटते आहे.
●विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत आता फार चालढकल करू नये. आपण ही निवडणूक जिंकू, चिंता नको. या तीन महत्वाच्या विषयांवर ही चर्चा झाली.
अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावलं आहे. मात्र अनिल देशमुख यांनी प्रत्यक्ष चौकशीला येण्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी घेण्याची विनंती केली आहे. याशिवाय त्यांनी सात दिवसांची मुदत मागितली आहे, त्याला ईडीने परवानगी दिली आहे. मात्र जर ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीअंती अटक केली तर महाविकास आघाडीसाठी हा सर्वात मोठा धक्का असेल. सरकारचं डॅमेज कंट्रोल, ईडी चौकशीला कसं सामोरं जायचं, या सर्व पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची चर्चा होऊ शकते.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तीन दिवसात दोनवेळा भेट घेतली. संजय राऊत काल वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यानंतर तिथूनच संजय राऊत हे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. संजय राऊत हे दोन दिवसात सातत्याने महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी भेटत आहेत. तीन दिवसापूर्वी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर दोन तास चर्चा झाली होती. त्यानंतर आज दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं झाली. या चर्चेनंतर लगेचच संजय राऊत शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. त्यामुळे महाविकास आघाडीत नेमकं काय चाललंय, याचे आडाखे राजकीय वर्तुळात बांधले जात आहेत.