भुसावळ : शहरातील हत्याकांडातील संशयिताच्या नावाने दोघांनी शहरातील व्यापाऱ्यांना भरदिवसा धमकावल्याचा प्रकार घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी तीन संशयितांविरोधात शहर व बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित राजा मोघेसह अन्य चार संशयितांना भुसावळात आणल्यानंतर हा प्रकार घडल्याने आता पोलिसांनी कसून चौकशीला सुरूवात केली आहे.
शहरातील गोपी मॉलचे रवी झामनानी व गुजराथी स्वीटचे कपिल शर्मा यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, तोंडाला रूमाल बांधून आलेल्या दोन तरुणांनी मोबाईलवरून फोन लावून भाई बोल रहे म्हणत फोन दिला असता समोरील व्यक्तीने मै राजा मोघे बोल रहा हु, आपको दुकान चलाना है तो मुझे पैसे देना पडेगा. गुजराथी यांच्याकडे दहा हजार व झामनानी यांच्याकडे 20 हजारांची खंडणी मागण्यात आल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. गुजराथी यांनी पैसे नसल्याचे सांगून आलेल्या दोघा पंटरांना मी कोर्टात येत असल्याचे सांगितल्यानंतर संशयित निघून गेले. ही बाब मेहता यांनी शहरातील व्यापाऱ्यांना सांगताच व्यापाऱ्यांनी शहर पोलिसात धाव घेतली. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांना घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली. व्यापाऱ्यांच्या आरोपानुसार, दुकानात आलेल्या दोघा संशयितांनी फोनवर राजा मोघे बोलत असल्याची बतावणी केली.