जळगाव : भुसावळ रेल्वेस्थानकावर पाणी भरण्यासाठी खाली उतरलेली महिला ताप्ती गंगा एक्स्प्रेसमध्ये चढत असताना, पाय घसरून प्लॅटफॉर्मवरून पडत होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर केशवस्मृती प्रतिष्ठानच्या ‘समतोल’ प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी तिला आधार देऊन तिचे प्राण वाचविले.
भुसावळ स्थानकवरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर ताप्ती गंगा एक्स्प्रेसमधून एक महिला पिण्याचे पाणी घेण्यासाठी उतरली असता, पाणी भरण्यापूर्वीच आतच रेल्वे सुरू झाली. महिला धावपळ करीत रेल्वे पकडण्याच्या प्रयत्न करीत असताना, महिलेचा पाय घसरून प्लॅटफॉर्मच्या खाली रेल्वेच्या चाकात पडत असताना, समतोल प्रकल्पाच्या प्रतिभा महाजन, दीपक पाचपांडे, प्रशांत चौधरी, तसेच ऑनड्यूटी हवालदार सुधीर पाटील यांनी महिलेला बाहेर खेचले.
साहसाबद्दल सर्वांकडून कौतुक
महिलेचे अर्धे शरीर प्लॅटफॉर्मच्या खाली गेले असताना, देवदूत बनून आलेल्या ‘समतोल’च्या सहकाऱ्यांनी कुठलाही विचार न करता महिलेला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले, तसेच रेल्वेमधील प्रवाशांना तत्काळ आवाहन करून साखळी ओढण्यास सांगितली. यांनतर महिलेस कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेनंतर समतोल प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी व हवालदारांनी दाखविलेल्या साहसाबद्दल सर्वांकडून कौतुक होत आहे. समतोल प्रकल्प रेल्वेस्थानकावर हरवलेल्या, भरकटलेल्या मुलांना सुरक्षित ठिकाणी सोडण्यासाठी कार्य करीत असतो.