मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, विधानसभा अध्यक्ष निवडीची आठवण करुन दिली आहे. येत्या पाच आणि सहा जुलैला विधानसभेचं पावसाळी अधिवेशन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या तिन्ही मागण्या महत्त्वाच्या असल्यांच म्हणत योग्य कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांना दिले आहेत.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज पत्र लिहिलं आहे. या पत्रात राज्यपाल म्हणतात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं शिष्टमंडळ 23 जून रोजी मला भेटलं. त्यांनी दोन निवेदने मला दिली आहेत. त्यामध्ये त्यांनी विधानसभा अधिवेशनाचा कालावधी वाढवणे, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि ओबीसी आरक्षण प्रलंबित असल्याने जिल्हा परिषद निवडणुका स्थगित करा, या मागण्या केल्या आहेत. हे तीनही विषय महत्त्वाचे आहेत. त्यावर योग्य कारवाई करुन, याबाबत मला कळवा” असं राज्यपालांनी म्हटलं आहे.