मुंबई : बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन हे त्यांच्या दमदार अभिनयासोबतच शिस्तप्रिय व्यक्तीमत्त्वासाठी ओळखले जातात. बिग बींनी आजवर चुकूनही असं काही काम केलं नाही, ज्यामुळे त्यांना पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागे. मात्र जे आजपर्यंत झालं नाही ते आता होताना दिसतंय. हेल्मेट न घालता दुचाकीवर प्रवास केल्याने नुकताच ट्रॅफिक पोलिसांनी त्यांचा चालान कापला. यामुळे ते चर्चेत होते. आता चालान कापल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
असं आम्ही नाही तर स्वत: अमिताभ बच्चन म्हणत आहेत. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये ते मुंबई पोलिसांच्या गाडीजवळ मान खाली करून उभे असल्याचं दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘अरेस्टेड’ (अटकेत). बिग बींचा हाच फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. त्यांना खरंच अटक झाली का, असा सवाल नेटकरी करत आहेत. बिग बींनी पोस्ट केलेल्या या फोटोवर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया आल्या होत्या. यावर अनेकांनी त्यांना हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला होता. सेलिब्रिटी आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई करणार नाही का, असाही सवाल नेटकऱ्यांनी मुंबई पोलिसांना केला होता. त्यानंतर बिग बींना एक हजार रुपयांचा दंड भरावा लागला.