जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील महापालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय कलाटणी येणार असून शिवसेनेतून १७ नगरसेवक भाजपात जाणार असल्याची दात शक्यता वर्तवण्यात येत आहे. पालिकेच्या राजकारणाला पुन्हा एकदा ग्रहण लागत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान पालिकेचे विरोधीपक्ष नेते सुनील महाजन आणि महापौर जयश्री महाजन हे दोघे आज राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची भेट घेणार असल्याची माहिती समजली आहे. सध्या शिवसेनेत सुरु असलेल्या अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर हि भेट महत्वाची असल्याचे सांगण्यात येत आहे. सत्तांतर झाल्यानंतर पालिकेत शिवसेनेचा भगवा फडकला त्यानंतर पालिकेच्या घरकुल घोटाळ्यात दोषी असलेल्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार उभी आहे. त्यांना कुठल्याही परिस्थितीत अपात्र करण्यासाठी आयुक्त यांच्या माध्यमातून शिवसेनेचे जोरदार प्रयत्न सुरु आहे. तर भाजपचे गटनेते भगत बालाणी यांना बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहे. गटनेता निवडी संदर्भात शिवसेनेने हालचाली गतिमान केल्या असून या प्रकाराने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेला पुन्हा अंतर्गत गटबाजीचे ग्रहण लागले असून, अंतर्गत कलह मोठ्या प्रमाणावर पेटला आहे.
तसेच शिवसेनेतून भाजपमध्ये १७ नगरसेवक जाणार असल्याची राजकीय चर्चा असून, त्यामुळे शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा मोठा राजकीय डाव माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी खेळला असल्याचे बोलले जात आहे. कारण भाजपा मधून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांवर वरिष्ठ स्थरावर अपात्रतेची कारवाई होणार असल्याने त्यांच्यात धावपळ सुरु झाली आहे. याप्रकारामुळे शिवसेनेत मोठ्या प्रमाणात अस्वथता निर्माण झाली असून यातून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे काय पर्याय काढतात याकडे राजकीय लक्ष लागून आहे.