मुंबई : एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाही. समीर वानखेडे यांना नुकतंच मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला. हायकोर्टाने त्यांना तात्पुरता स्वरुपात अटकेपासून संरक्षण दिलं आहे. त्यानंतर समीर वानखेडे आज सीबीआय चौकशीला सामोरे गेले. पण या दरम्यान समीर वानखेडे यांचं टेन्शन वाढवणारी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरु असतानाच आता आणखी एका यंत्रणेकडून त्यांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
समीर वानखेडे यांची एकीकडे सीबीआयकडून चौकशी सुरू असतानाच सीबीआयसीकडूनही चौकशी सुरू केली जाण्याची शक्यता आहे. सीबीआयसी म्हणजे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभाग आहे. याच विभागाच्या अधिपत्याखाली वानखेडे काम करतात. एनसीबीच्या एसआयटीने तयार केलेला अहवाल सीबीआयसी विभागाकडेही देण्यात आला.
निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता
सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता याच अहवालाच्या आधारे वानखेडे यांची विभागीय चौकशी सुरू झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या चौकशीनंतर वानखेडे यांच्यावर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे यांच्यावर निलंबनाची कारवाईदेखील होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
समीर वानखेडे यांची पाच तास चौकशी
समीर वानखेडे यांची आज तब्बल पाच तास चौकशी पार पडल्याची माहिती मिळत आहे. ते सकाळी साडेदहा वाजता सीबीआय कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर जवळपास पाच तास त्यांची चौकशी झाली. पण सीबीआयला अजूनही काही प्रश्रांची उत्तरे मिळालेली नाहीत. त्यामुळे सीबीआय कदाचित पुन्हा एकदा समीर वानखेडे यांना चौकशीसाठी बोलावू शकते.