मुंबई: महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील प्रसिद्ध इन्स्पेक्टर एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना नवीन पोस्टिंग मिळाली आहे. दया नायक यांची मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचमध्ये नवीन पोस्टिंग देण्यात आली आहे. स्वत: दया नायक यांनी ट्विट करून नव्या पोस्टिंगची माहिती दिली आहे. त्यांनी तब्बल 84 एन्काऊंटर आणि हजारांहून अधिक गुन्हेगारांना अटक केली आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, दया नायक यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 9 मध्ये पदभार स्वीकारला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दया नायक यांच्यासह अन्य पाच अधिकाऱ्यांनाही नवीन पोस्टिंग देण्यात आल्या आहेत. इतर पाच अधिकाऱ्यांना उपनगरीय मानखुर्द, मरिन ड्राइव्ह, कांदिवली आणि मुंबई वाहतूक पोलिसांमध्ये नवीन पोस्टिंग देण्यात आली आहे. दया नायक यांनी ट्विट केले आहे की, महाराष्ट्र एटीएसमध्ये तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर ते मुंबई क्राइम ब्रँचमध्ये त्यांच्या नवीन पोस्टिंगवर रुजू झाले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये असेही म्हटले आहे- प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करू आणि आपल्या क्षमतेनुसार मुंबईची सेवा करू अशी आशा आहे.
28 मार्चपासून नवीन पोस्टिंगची प्रतिक्षा
दया नायक यांची 28 मार्च रोजी महाराष्ट्र एटीएसमधून मुंबई पोलिसात बदली करण्यात आली होती. दया नायक यांची बदली होऊन जवळपास दोन महिने झाले तरी त्यांना नवीन पदस्थापना देण्यात आली नव्हती त्यामुळे ते नवीन पोस्टिंगची वाट पाहत होते. दया नायक जवळपास तीन वर्षे महाराष्ट्र एटीएसमध्ये कार्यरत होते.
बऱ्याच दिवसांनी गुन्हे शाखेत वापसी
एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक तब्बल 20 वर्षानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत परतले आहेत. अंडरवर्ल्डच्या दहशतीचा काळ असताना दया नायक हे 1999 ते 2003 दरम्यान अंधेरी सीआययूमध्ये तैनात होते. नंतर त्यांना कांदिवली पोलीस ठाण्यात पोस्टिंग देण्यात आली. आता सीआययू मुंबई पोलिसांच्या मुख्यालयापुरते मर्यादित झाले आहे. दया नायक हे अँटिलिया जिलेटिन आणि हिरेन मनसुख खून प्रकरणांचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र एटीएसच्या पथकातही होते. या प्रकरणांचा तपास नंतर एनआयएकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणी एनआयएने सीआययूचे प्रभारी सचिन वाझे याला अटक केली होती.