बुलडाणा – रस्ते महामार्गांचा विकास साधून अपघात टाळण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, वाहनांची वाढती संख्या, वाढीव वाहतूक आणि हायस्पीड प्रवासामुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याचे दिसून येते. आता, पंढरपूर येथे विठोबाच्या दर्शनासाठी गेलेल्या शेगावातील भाविकांच्या वाहनाला परत येत असताना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव जवळ मोठा अपघात घडला.
शेगाव शहराच्या प्रवेशद्वाराजवळ आज सकाळी सहाच्या सुमारास भाविकांना घेऊन येणारी क्रुझर गाडी प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या स्वागत फलकाच्या पिलरवर धडकली. या अपघातामध्ये ३ भाविक जागीच ठार झाले तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, नागरिकांच्या मदतीने सर्व भाविकांना शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आले. तर, गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अकोल्यात हलवण्यात आले आहे. क्रुझर चालकाला झोप लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले अन् हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कारण, रात्री पासून या गाडीचा प्रवास सुरु होता. विशेष म्हणजे पीडित कुटुंबीय हे त्यांच्या घरापासून अवघ्या २ किलो मीटर अंतरावर असतानाच हा अपघात झाला.