पुणे : पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मॅट्रोमोनियल साईटवरुन लग्न जुळवणे एका महिलेस चांगलेच महागात पडले आहे. एका साइटवर पुण्यातील 33 वर्षीय महिलेनं नोंदणी केली होती. यावरुन ब्रिटनमध्ये स्थायिक असल्याचे सांगून एका तरुणाने महिलेसोबत ओळख वाढवली. यानंतर त्याने वेगवेगळे कारण सांगून 8 लाख रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यांनतर तत्काळ सांगवी पोलीस ठाण्यात धाव घेत महिलेने गुन्हा दाखल केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पुण्यातील महिलेनं एका ऑनलाइन साइटवर स्वत: ची नोंदणी केली होती. महिलेनं सुमारे दोन महिन्यांपूर्वी यूकेमध्ये स्थायिक झालेल्या पुरुषाची प्रोफाइल पाहिली होती. यानंतर त्या पुरुषाशी ओळख परिचय वाढल्यानंतर त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुरुषाने तिला सांगितले की, मी सिंगापूरला मिटिंगसाठी जात आहे आणि तिला आणि तिच्या कुटुंबाला भेटण्यासाठी पुण्याला थांबणार आहे. तसेच त्याचा सामान तिच्या पत्त्यावर पाठवला आहे. त्यांनतर महिलेला सीमा शुल्क आकारण्याची मागणी करणारा कॉल आला. महिलेने 58 हजार रुपये भरल्यानंतर बॅगमधील सोने, विदेशी चलन आणि उच्च श्रेणीतील मोबाइल फोनसाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल, असे सांगून 7 लाख 98 हजार रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यांनतर तत्काळ सांगवी पोलीस ठाण्यात धाव घेत महिलेने गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कशी केली जाते फसवणूक?
मॅट्रिमोनियल साइटवर एक प्रभावी ऑनलाइन प्रोफाइल तयार करून, संभाव्य वर असल्याचे भासवले जाते. त्यांनतर फसवणूक करणाऱ्या महिलांशी मैत्री करतात. त्यांच्याशी जवळीक साधून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करतात. वधूचे पालक म्हणून बोलण्यासाठी आवाज बदलणाऱ्या ॲप्सचा वापर केला जातो. एकदा महिलांचा विश्वास बसला की, आणीबाणीची परिस्थिती असल्याचे भासवून महिलांकडून पैसे उकळले जातात. त्यामुळे अशा प्रकारांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.