भुसावळ : मुंबईतील ज्वेलर्स दुकानात काम करणाऱ्या कारागीरास वेळेवर पगार मिळत नव्हता. त्यामुळे सराफा व्यावसायीकाकडून मिळणाऱ्या वागणुकीला कंटाळून 28 लाख रुपये किंमतीचे 498 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे चोरले व ट्रेनने पश्चिम बंगालकडे प्रवास सुरू केला. त्यास भुसावळ रेल्वे स्थानकावर लोहमार्ग व आरपीएफ पोलिसांनी अटक केली. सुदाम निमाई सामंता (वय 31) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मनोज मोहनलाल जैन (वय 50, कुर्ला, मुंबई) यांचा मुंबईतील कुर्ला भागात सोन्याचे दागिणे बनवण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात पश्चिम बंगाल भागातील सुमारे 15 कारागीर अनेक वर्षांपासून कामाला आहेत. संशयित सुदाम सामंता हा देखील कारागीर असल्याने त्याच्याकडे 498 ग्रॅम सोने दागिने बनवण्यासाठी दिले होते. शनिवारी दुपारी दिड वाजता जैन हे जेवायला गेल्यानंतर कारागीराने संधी साधत रेल्वेने धूम ठोकली. दुपारी अडीच वाजता जैन हे कारखान्यात आल्यानंतर जैन यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी धाव घेत कुर्ला पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. संशयिताचा फोटो, पत्ता व वर्णन दिल्यानंतर यंत्रणेने तपासचक्रे फिरवली.
पोलिसांकडून रेल्वे गाड्यांची झडती
कुर्ला आरपीएफ निरीक्षक पी.आर.मीणा व कुर्ला पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक गणेश काळे यांनी भुसावळ स्टेशनचे निरीक्षक आर.के. मीणा यांना माहिती दिल्यानंतर पथक तयार करण्यात आले. आरपीएफ पोलिसांनी भुसावळ स्थानकावर हावडाकडे जाणाऱ्या गाड्यांची तपासणी सुरू केली. संशयित आरोपी दिसताच त्यास ताब्यात घेवून रेल्वे सुरक्षा बलाच्या ठाण्यात आणण्यात आले. यावेळी संशयिताच्या बॅगेतून 28 लाख रुपये किंमतीच्या 32 सोन्याच्या साखळ्या जप्त करण्यात आल्या. कुर्ला पोलीस स्टेशन मुंबईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश काळे हे कर्मचार्यांसह आल्यानंतर त्यांनी आरोपीचा ताबा घेतला. भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्कतमुळे चोरटा पकडण्यात यश आल्याने यंत्रणेचे कौतुक करणयात आले.