जळगाव : जळगावसह, भुसावळ, चाळीसगाव तसेच राज्यातील अनेक महत्त्वपूर्ण शहरांमध्ये कारमधून आलेल्या सुटा-बुटातील हायप्रोफाईल चोरट्यांकडून भरदिवसा घरफोड्यांचे प्रकार गेल्या तीन वर्षात घडले होते. चोरटे दरवेळी वेगवेगळ्या वाहनांचा व नंबरप्लेटचा वापर करीत असल्याने यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हती मात्र गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे जळगाव जिल्ह्यातील आरोपींच्या टोळीचा उलगडा केला आहे. चोरीचे सोने खरेदी करणार्या जळगावातील दोघा सराफांसह चार आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींचे तीन साथीदार वाहनांसह पसार झाले आहेत. दरम्यान, टोळीने भुसावळ, जळगाव, चाळीसगाव व औरंगाबाद, नाशिक, पुणे जिल्ह्यात तब्बल 31 घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. भुसावळ शहर हद्दीतील तीन तर बाजारपेठ हद्दीतील 10 गुन्ह्यांचा यात समावेश आहे.
जितेंद्र गोकुळ पाटील, अमोल गोकुळ पाटील, पवन उर्फ पप्पू सुभाष पाटील, सागर लक्ष्मण देवरे (सर्व रा.मोहाडी, ता.जामनेर), आकाश सुभाष निकम, महेंद्र ज्ञानेश्वर बोरसे (दोन्ही रा.नांद्रा, ता.पाचोरा) व अमोल सुरेश चव्हाण (सामनेर, ता.पाचोरा) हे संशयित नेहमीच वेगवेगळ्या वाहनांना दरवेळी नंबरप्लेट बदलवून प्रवास करीत असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर संशयितांवर पाळत ठेवल्यानंतर त्यातील चौघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी घरफोड्यांचा पाढाच वाचून दाखवला. टोळक्याचे साथीदार जितेंद्र व अमोल पाटील व पप्पू पाटील हे पसार असून अन्य चौघांना 26 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गावठी कट्ट्यासह घरफोडीचे साहित्य जप्त
अटकेतील चौघा आरोपींकडून घरफोडी करण्यासाठी लागणारेे साहित्य, विविध वाहनांच्या 24 नंबरप्लेट, चांदीचे दागिणे, एक गावठी कट्टा, तीन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आरोपींनी गेल्या तीन वर्षात 31 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यात भुसावळसह जळगाव, चाळीसगावातील गुन्ह्यांसह औरंगाबाद, नाशिक व पुणे जिल्ह्यात भर दिवसा अपार्टमेंटमध्ये शिरून घरफोड्या केल्याचा समावेश आहे. आरोपींचे तीन साथीदार वाहनांसह पसार असून त्यांच्या अटकेनंतर अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची दाट शक्यता आहे.