जळगाव: दरवर्षाप्रमाणे मे महिन्याच्या शेवटी पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या मुलाखतीस २४ मेपासून सुरूवात होणार आहे. दरम्यान, महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेतून यंदा केवळ सात जणांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने अत्यल्प जागा असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरू आहे. दरवर्षी पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे गॅझेट ३० मेच्या आत प्रसिद्ध करावे लागते. त्या अनुषंगाने जिल्हा पोलिस दलातून विनंती, कार्यकाळ पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची माहिती पोलिस अधीक्षकांनी काही दिवसांपूर्वीच मागवली आहे. काही अर्जांवर यापूर्वीच काम पूर्ण झालेले आहे.
दरम्यान, यंदा स्थानिक गुन्हे शाखेतून केवळ सात जणांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. या सात जागांवर बदली मिळवण्यासाठी प्रचंड चुरस सुरू आहे. तर दुसरीकडे या सात पैकी काही जण पुन्हा कार्यकाळ वाढवून मागण्याचीही विनंती करणार आहे. त्यामुळे या जागा देखील कमी होण्याची शक्यता आहे. तसेच पोलिस अधीक्षक एम. राजकुमार हे केवळ कामगिरीच्या मेरीटवर बदल करणार असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे. यात कोणत्याही दोन पोलिस ठाण्यांमध्ये किमान कार्यकाळ पूर्ण केल्याचाही निकष ठेवला जाणार आहे. परिणामी अनेकांसाठी ही अडचण महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे या वेळी अनेकांची माेठी गाेची हाेणार आहे. दरम्यान, मुलाखतीनंतर २९ मे राेजी गॅझेट प्रसिद्ध करण्याचे नियाेजन प्रशासनाचे आहे.