आयुक्त दालनासमोर मक्तेदाराने मांडला ठिय्या; चाळीस दिवसांपासून बिलाची फाईल पेंडींग
जळगाव राजमुद्रा : महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे गेल्या ४० दिवसांपासून रस्ते व गटारींच्या बिलाची फाईल पेंडींग असून आयुक्तांकडून बिल अदा केले जात नसल्यामुळे एका मक्तेदाराने बुधवारी रात्री मनपा आयुक्त यांच्या दालनासमोर ठिय्या मांडला होता. सायंकाळी ६.३० वाजेपासून त्या मक्तेदाराने ठिय्या मांडला असून रात्री ९ वाजेपर्यंत हा मक्तेदार जागेवरून उठायला तयार नसल्यामुळे मनपाचे शहर अभियंता यांच्यासह कर्मचारी देखील रात्री उशिरापर्यंत तेथेच अडकून पडले होते.
शहरातील रस्ते व गटारींची कामे करून देखील आयुक्तांकडून बिल अदा केले जात नसल्यामुळे मक्तेदार राकेश रमेश पाटील यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.
व्याजाने पैसे काढून कामे केली असतांना महापालिकेकडून कामांची बिले अदा केली जात नाही. गेल्या ४० दिवसांपासून आयुक्तांकडे आपण केलेल्या कामांच्या तीन फाईली पडून आहेत. तसेच २० दिवसांपासून १ फाईल पडून आहे, मात्र आद्यापपर्यंत आयुक्तांकडून बिल मंजूर करण्यात आलेले नसल्याचा आरोप मक्तेदार राकेश रमेश पाटील यांनी केला आहे. तसेच जोपर्यंत बिलांवर सह्या होणार नाहीत तोपर्यंत आपण उठणार नाही, असा पवित्रा राकेश पाटील यांनी घेतला असून रात्री ९ वाजेपर्यंत ते आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या मांडून बसले होते.
मात्र आयुक्तांकडून बिल देण्यात येईल यासोबतच कुठलाही वाद नको म्हणून महापालिकेतल्या तीन ज्येष्ठ माजी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत मध्यस्थीचा प्रयत्न केला आहे. आयुक्तांनी जर वेळेत बिल काढले नाही आणखी उशीर केला तर तीव्र आंदोलन करण्याची भूमिका देते राकेश पाटील येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आयुक्तांनी याबाबत कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही यामुळे नेमकी प्रशासनाची भूमिका राकेश पाटील यांच्या बिलाबाबत नेमकी काय आहे ? हे समजू शकत नाही.