(राजमुद्रा, जळगाव) धरणगाव येथील तहसीलदार नितीन देवरे यांच्या बेकायदेशीर कारवाई व गैरवर्तणूकी संदर्भात जिल्हा परिषद सदस्य माधुरी चंद्रशेखर अत्तरदे या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेल्या आहेत. तहसीलदार नितीन देवरे हे धरणगाव येथे रुजू झाल्यापासून आपली मनमानी करत असून सर्वसामान्यांना तसेच तलाठी वर्गाला वेठीस धरून अन्यायकारक वागणूक देत आपल्या पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. देवरे यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र त्यावर अद्याप कोणतीही उपाययोजना झाली नसल्याचा सूर निघत आहे. त्यामुळे उपोषणाचा मार्ग अवलंबला असल्याचे जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांनी राजमुद्राशी बोलतांना सांगितले.
बांभोरी येथील माजी सरपंच राकेश नन्नवरे यांनी देखील 15 एप्रिल रोजी दार तहसीलदार नितीन देवरे यांच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ करून कुठलाही संबंध नसताना अडीच लाख रुपये दंड भरण्यास भाग पाडणे बाबत तक्रार दाखल केली आहे. मात्र याबाबतही अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. भ्रष्टाचारी तहसीलदार देवरे यांचा तलाठी आणि सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी माधुरी अत्तरदे यांच्याकडून होत असून जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.