उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे – पवार यांनी त्वरित अपलोड चे दिले आश्वासन.
जळगांव राजमुद्रा : शिक्षक भरती संदर्भात शासनाने २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ दरम्यान शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टी ए आय टी) घेण्यात आली. त्यानुसार पात्र उमेदवारांना पवित्र पोर्टल या शिक्षक भरतीच्या वेबसाईटवर स्वप्रमाणपत्र तयार करण्याची सूचना करण्यात आली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी संस्थांच्या शाळांची जाहिरात सदर वेबसाईटवर १६ ऑक्टोबर २३ पासून अपलोड करण्याचे शासन आदेशानुसार आदेशित करण्यात आले. त्या आदेशानुसार अनेक शाळांनी शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती पवित्र पोर्टलवर अपलोड केलेली आहे. पण अद्याप जिल्हा परिषद जळगाव येथे सुमारे २५२ शिक्षकांच्या रिक्त जागांची माहिती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली नाही.
जिल्हा परिषद जळगाव मध्ये २५२ उर्दू शिक्षकांची नियुक्ती रखळणार असल्याची शक्यता आहे. म्हणून अल्पसंख्यांक समाजाच्या एका प्रतिनिधी मंडळाने सर्वप्रथम उप मुख्य कार्यकारी अधिकारी,सामान्य प्रशासन श्रीमती स्नेहा कुडचे – पवार यांची भेट घेऊन त्यांना उर्दू शिक्षकांच्या भरती बाबत एक सविस्तर निवेदन दिले.
त्यांच्यानंतर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनाही निवेदन देण्यात आले ते निवेदन श्रीमती सुप्रिया सुर्वे व नरेंद्र चौधरी यांनी स्वीकारले.
निवेदानातील मागणी
उपरोक्त निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संपूर्ण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शाळां मध्ये शिक्षकांच्या रिक्त पदां बाबत जाहिराती पवित्र पोर्टल या वेबसाईटवर अपलोड करण्यात येत आहे. पण दुर्दैवाने जळगांव शहर महानगरपालिकेत सुमारे २५ व जिल्हा परिषद येथे २५२ उर्दू शिक्षकांच्या जागा रिक्त असतांना सुद्धा अद्याप त्यांची माहिती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली नाही. यामुळे उर्दू भाषिक विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी ही माहिती लवकरात लवकर अपलोड करून शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा करावा.
निवेदन स्वीकारताना श्रीमती कुडचे – पवार उप मुख्य कार्यकारीअधिकारी यांनी त्वरित संबधीत कक्ष अधिकारी यांना बोलवून आदेश केले व शिष्ट मंडळाला आश्वासन दिले की एका दिवसातच उर्दू शिक्षकांच्या २५२ रिक्त जागा बाबत जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात येईल व यामुळे उर्दू शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा होईल.
या शिष्टमंडळात जळगांव जिल्हा मन्यार बिरादरीचे फारुक़ शेख, कुल जमातीचे सय्यद चांद, वरिष्ठ पत्रकार व शिक्षक अंजुम रज़्वी, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष मज़हर पठाण, एम आय एम चे अध्यक्ष अहमद सर,सेवानिवृत्त शिक्षक साबीर इमदाद, काँग्रेस पक्षाचे बाबा देशमुख, शिकलगर बिरादरी अनवर खान, एंजल फूडचे दानियाल शेख व राजा मिर्झा आदी उपस्थित होते.