मुंबई राजमुद्रा | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ओथर रोड जेल प्रशासनाबद्दल धक्कादायक खुलासे केले आहे. आजच्या सामना मध्ये खा.संजय राऊत यांनी अथर्व रोड जेलमध्ये नेमकं कशा पद्धतीने कामकाज चालते याबाबत लिहिले आहे. कोर्टाकडून कायद्याबाबत दिलेल्या कोणत्याही आदेशाचे पालन होत नाही, यामध्ये वैद्यकीय सेवा तसेच जेवणाबाबत मोठ्या प्रमाणात कैद्यांचे हाल आहेत. जेलमध्ये असलेले कारभारी त्यांच्या मर्जीने सर्व जेल प्रशासन चालवतात, सर्व देशात भ्रष्टाचार आहे, मात्र ऑर्थर रोड जेलमध्ये भ्रष्टाचार नाही तर संपूर्ण व्यवस्थाच भ्रष्टाचारी आहे. असा दावा देखील खा. संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे.
कसाबचे भूत ?
“अंधविश्वास आणि भूत-प्रेताच्या कहाण्या ऑर्थर रोडलाही धुमाकूळ घालतात. कसाबचे भूत निघते ही कथा आहेच. पण त्याच कसाबच्या बॅरेकमध्ये मी आणि अनिल देशमुख राहत होतो. मी सांगितले, कसाबला इथून पुण्याला नेले. तिथेच फासावर लटकवले. येरवडा कारागृहात त्याला गाडले. त्यामुळे त्याचे भूत तेथे असायला हवे. पुण्याहून मुंबईला ते भूत रोज कशाला येईल? कसाबला प्रत्यक्ष पाहणारे अनेकजण तेव्हा येरवड्यात होते. ते कसाबच्या बाबतीत अनेक कथा-दंतकथा सांगत. पण त्याच कसाबच्या ‘यार्डा’त आमचा मुक्काम होता”, असं संजय राऊत म्हणाले.
“कसाबचे भूत शोधण्यासाठी मी खूप प्रयत्न केला. रात्र जागून काढल्या. पण कसाब दिसला नाही. यार्डामध्ये दिवे कधीच विझत नाहीत. लख्ख प्रकाशात भुते फिरकत नाहीत. आमच्या सारखे लोक सरकारला भुतासारखे वाटत असल्याने कसाबच्या कोठडीत आम्हाला डांबून ठेवले”, असं राऊत म्हणाले.
“कैद्यांना रक्ताच्या नातेवाईकांना भेटण्याची मुभा असते. त्या हक्काच्या मुलाखतीपासून खाणे-पिणे, कपडे, फोनवर नातेवाईकांशी संवाद साधणे या सगळ्यात भ्रष्टाचार होत असतो. ‘अगर आप आर्थिक रूपसे कमजोर है, तो जेल आपके लिए यातनागृह है.’ असे रुपेश कुमार सिंह म्हणतो व ते सत्य मी स्वतः पाहिले, अनुभवले आणि अनेकांना यातनागृहात जगताना पाहिले”, असा दावा संजय राऊतांनी केलाय.
“कसाब, अबू जिंदाल, अबू सालेम हे आर्थर रोड तुरुंगात होते. त्यांच्या जेवणा-खाण्याची व्यवस्था उत्तम होत असे. ते अतिरेकी असले तरी मानव अधिकाराचे सर्व लाभ त्यांना मिळत. जे इतर सामान्य कैद्यांना कधीच मिळत नाहीत. अनेक उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, कच्चे कैदी जेलमध्ये नरकयातना भोगत आहेत”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
काय लिहिलंय संजय राऊत यांनी ?
“आर्थर रोडमध्ये अनेक कैदी पाण्यात ब्रेड किंवा चपाती भिजवून खाताना मी पाहिले. विशेषतः सलग सुट्टी येते त्या दिवसात संध्याकाळचे जेवण सकाळीच दिले जाते. सकाळी 10:30 ला वाढलेले जेवण रात्री आठपर्यंत आंबल्यासारखे होते. वास येतो. डाळ तर लगेच खराब होते. अशावेळेला पाण्यात ब्रेड किंवा चपाती भिजवून ती रात्र ढकलणे एवढेच हाती असते. असे धक्कादायक लिखाण ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी केले आहे.
माझ्यावर आणि अनिल देशमुखांवर काही वेळा ही वेळ आली. पण आम्ही त्याबाबत कोणतीही कुरकुर केली नाही. एकदा हल्दीरामची सुकी भेळ खाऊन आम्ही रात्रीचे जेवण उरकले. कारण घरून आलेले जेवण खराब झाले”, असं संजय राऊत यांनी आपल्या लेखात सांगितलं आहे.