जळगाव राजमुद्रा (कमलेश देवरे) | येणारे 2024 हे संपूर्ण वर्ष निवडणुकीचे वर्ष म्हणून ओळखले जाणार आहे. देशात पक्षीय लढाईमध्ये राष्ट्रीय पक्षांची प्रतिष्ठापनाला लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून भाजप आणि इंडिया आघाडी कडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. मात्र सर्वाधिक उमेदवार भाजपच्या गोटातून इच्छुक असल्याचं दिसून येत आहे. जी स्थिती लोकसभेची तीच स्थिती विधानसभेची आहे. यामुळे ” कामाला लागा …’ नेत्यांच्या या शब्दामुळे अनेक इच्छुकांची कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभेसह विधानसभेमध्ये विद्यमानांचे तिकीट कापली जाणार ही चर्चा जोर धरत असताना अनेक इच्छुक आपली वर्णी लागावी म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे.
निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या हाती
लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात वरिष्ठ नेत्यांची संपर्क साधायला सुरुवात केली आहे अनेक इच्छुक सहा महिने ते वर्षभरापासून लोकसभा मतदारसंघांमध्ये सक्रिय झाले आहे. विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे जळगाव लोकसभेचे प्रतिनिधित्व करत असून तर रावेर लोकसभेचे रक्षा खडसे ह्या नेतृत्व करीत आहे. विद्यमानांचे तिकीट कापली जाणार ही फक्त एक चर्चाच आहे. अधिकृत दुजोरा याबाबत वरिष्ठ पातळीवर कोणीही दिलेला नाही. विद्यमान खासदारांबद्दल पाहिजे तेवढी नाराजी दिसून येत नाही, राज्यातील महत्त्वपूर्ण नेते असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची शिफारस रावेर व जळगाव लोकसभेसाठी महत्त्वपूर्ण मानली जाणार आहे. मात्र लोकसभेत दिल्लीतील वरिष्ठ नेते निर्णय घेतील हे निश्चित आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये जळगाव शहरातील आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वाधिक इच्छुक उमेदवार तयारी करत असल्याचे बघायला मिळत आहे. विद्यमान आमदार सुरेश भोळे हे सध्या विधानसभेत जळगाव शहराचे प्रतिनिधित्व करीत आहे. दोन वेळा निर्विवादपणे त्यांनी जळगाव विधानसभेमधून विजय मिळवला, मात्र सध्याची स्थिती बघता जळगाव विधानसभेत इच्छुकांची मोठी लिस्ट भाजपकडे आहे. अश्विन सोनवणे, सुनील खडके, सुनील भंगाळे यासारखी नावे सध्या चर्चेत आहे. मात्र संघ परिवारातून काही नव्या चेहऱ्यांची देखील चाचपणी सुरू असून बैठक सत्र सध्या सुरू आहे. विद्यमान आमदारांचे तिकीट कापल्यास उमेदवारी आपल्यालाच मिळेल असे दावे-प्रती दावे केले जात आहे.
तापी खोऱ्यातील विधानसभा मतदारसंघ बघता संजय सावकारे यांना भुसावळ मधून भाजप कायम ठेऊ शकते, रावेर – यावल मधून भाजप उमेदवाराची चाचपणी करीत आहे. जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांना संधी मिळू शकते. भाजपाचे दिवंगत नेते हरिभाऊ जावळे यांच्या अकाली निधनाने भाजपमध्ये त्या भागात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रावेर – यावल मध्ये विद्यमान मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहारची जादू चालणार असा राजकीय कयास मानला जात आहे. गेल्या पाच वर्षां मध्ये अनिल चौधरी यांनी दाखवलेली सक्रियता, जनसंपर्क प्रहारची जमेची बाजू आहे. मुक्ताईनगर मधून चंद्रकांत पाटील यांना माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या विरोधात भाजप किती ताकद देते, ते देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. लोकसभा निवडणूक होताच अनेक मोठे पक्ष प्रवेश मुक्ताईनगर मधून भाजपमध्ये होण्याची शक्यता आहे.
गिरणा खोऱ्याचा तपशील घेतल्यास जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. गुलाबराव पाटील या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, मात्र भाजपकडून ग्रामीण मधून इच्छुक उमेदवार आहे. योग्य वेळेला उमेदवारांचे चेहरे समोर आणले जातील, पारोळा एरंडोल मतदारसंघ चिमणराव पाटील यांच्या रूपाने शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यांचे सुपुत्र जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील हे आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना शिंदे गटा कडून लढवण्याची शक्यता आहे. उबाटा सह भाजपकडून या ठिकाणी देखील ताकदीचे उमेदवार ऐन वेळेस समोर येऊ शकतात. अमळनेर मध्ये मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील व माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यामध्ये जोरदार लढत होणार आहे. अनेक नवीन चेहरे अमळनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवू शकता. मतांचं विभाजन या मतदारसंघांमध्ये झाल्यास धक्कादायक निकाल या मतदारसंघात लागण्याची शक्यता आहे.
भाजपचे पारडे जड
लोकसभेची आचारसंहिता अवघ्या काही दिवसात जाहीर होणार आहे. यामुळे लोकसभेचे तिकीट आपल्याला मिळावे म्हणून नेत्यांची मर्जी राखण्याचे प्रयत्न सुरू आहे. भाजपची स्थिती पाहिली तर उमेदवारांची मोठी गर्दी दिसून येत आहे जळगाव लोकसभा रावेर लोकसभा भाजपाचे बालेकिल्ले मानले जातात, पक्ष ज्याला शेंदूर लावेल तो हमखास निवडून येईल असे एकंदरीत वातावरण भाजप मध्ये आहे. पाहिजे त्या ताकतीचा विरोधी उमेदवार अद्याप पर्यंत समोर आलेला नाही किंवा विरोधकांनी याबाबतची चर्चा देखील सुरू केलेली नाही. यामुळे सध्यातरी दोन्ही लोकसभेमध्ये भाजपचे पारड जड असल्याचे दिसते आहे.
दिल्ली दरबारातून फोन – कॉल्स
महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघांमध्ये स्वतः भाजपा हायकमांड लक्ष देऊन आहे. बूथ कमिट्या सक्षमीकरणावर अधिक भर दिला जात आहे शक्ति केंद्रप्रमुख, भाजप वॉरियर्स यांना देखील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष सूचना दिल्या जात आहे. दिल्ली दरबारात थेट फोन कॉलिंग केले जात अनेकांची उत्तरे देताना धमछाक उडत आहे. संघटनात्मक आढावे घेऊन वरिष्ठ पातळीवर रिपोर्टिंग केले जात आहे. यादरम्यान कामात कचुराई करणाऱ्यांना बाबत एवढेच नाही अर्ध पूर्ण माहिती देणाऱ्यांची परेड जय भीम याबाबत जिल्हास्तरावर सूचना दिल्या जात आहे.