चाळीसगाव (राजमुद्रा) – चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात ऑगस्ट २०२१ या वर्षात अतिवृष्टी, महापूर, ढगफुटी याचा मोठा फटका बसला होता. ऑगस्ट २०२१ महिन्याच्या शेवटी व पुन्हा सप्टेंबर २०२१ महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ढगफुटीसदृश्य अतिवृष्टी झाला होता. त्यामुळे पाटणादेवी अभयारण्य क्षेत्र व गिरणा – मन्याड धरण क्षेत्रात जवळपास एका रात्रीत १४० मिलिमीटर पाऊस झाल्याने प्राथमिक अंदाजानुसार या महापुरात २६६० जनावरांचा मृत्यू, ११२३१ पोल्ट्रीचे पक्षी, २२५० घर व व्यावसायिक दुकानांचे अंशत व पूर्णतः नुकसान, सुमारे १५८०० हेक्टर वरील जमिनी व पिकांचे नुकसान झाले होते.
अचानकपणे आलेल्या महापुरामुळे घरे, जनावरे, गोठाशेड वाहून गेली होती तसेच अनेक घरांमध्ये पाणी साचल्याने मोठी वित्तहानी झाली होती. ग्रामीण भागात नदी किनारी असणारी शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांची हजारो छोटी – मोठी जनावरे मृत्युमुखी पडली, नदी किनाऱ्यावरील संपूर्ण घरच वाहून गेल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला होता,
या महापूरग्रस्तांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून नुकताच राज्य शासनाच्या वतीने अनुदान मंजूर झाल्याचा शासन निर्णय प्रकाशित झाला आहे. त्यात चाळीसगाव मतदारसंघासाठी ६ कोटी ३८ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळणार आहे.
यामुळे दुष्काळाच्या गर्तेत असणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील महापूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी राज्य शासनाचे व महापूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांना मदत मिळवून देणारे चाळीसगाव मतदारसंघाचे संवेदनशील आमदार मंगेश चव्हाण यांचे आभार मानले आहेत.
*प्रत्येक संकटात चाळीसगाव वासीयांच्या सोबत – आमदार मंगेश चव्हाण*
ऑगस्ट २०२१ मध्ये मध्यरात्री झालेल्या महापुरामुळे मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली होती. त्यावेळी महापूरग्रस्त प्रत्येक गावाला भेट देऊन पंचनामे केले होते. तसेच ज्यांची घरे वाहून गेली होती त्यांना तात्पुरती घर देखील स्वखर्चाने उभारून दिली होती. गेल्या २ वर्षांपासून मदतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित होता. याबाबत माझ्या पाठपुराव्याला यश आले असून जीवितहानी, पशुधन हानी, घर, गोठा, संसारोपयोगी साहित्य अशी वित्तहानी झालेल्या महापूरग्रस्तांना ६ कोटी ३८ लाख निधी प्राप्त झाला आहे. लवकरच सदर मदत त्यांच्या खात्यात जमा केली जाईल.
सदर मदत मंजूर केल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिलदादा पाटील, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे आभार मानले आहे.
कोणत्याही संकटात मी चाळीसगाव वासीयांना एकटे सोडणार नाही, राज्य शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध राहील हा विश्वास यानिमित्ताने आ.मंगेश चव्हाण यांनी दिला आहे.