(राजमुद्रा, जळगाव) जळगावातील सिंधी कॉलनी परिसरातील स्वामी टॉवरमध्ये राहणार्या स्वतःच्या काकाच्या घरात १७ एप्रिल रोजी नियोजन करून सायंकाळी बंदुक आणि चाकूच्या जोरावर दरोडा टाकणार्या पुतण्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टोळीसह अटक केली आहे. यात पुतण्यासह त्याच्या चार मित्रांचा सहभाग असून काकांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोडेखोर कैद झाले होते. घरात मौल्यवान ऐवज न मिळाल्याने दरोडेखोर दाराला बाहेरून कडी लावून पसार झाले होते.
यातील संशयित पुतण्या सनी इंदरकुमार साहित्या (वय २५) जळगाव, राकेश शिवाजी सोनवणे (वय ३५) धुळे, उमेश सुरेश बारी (वय-२५) जळगाव, मयुर अशोक सोनार (वय ३५) जळगाव आणि नरेंद्र उर्फ योगेश अशोक सोनार (वय ३४) जामनेर या पाच जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून घटनेत वापरात आलेली चारचाकी जप्त करण्यात आली आहे. प्रकाश साहित्या यांचा पुतण्या सनी यानेच हा दरोडा घडवून आणला असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळताच त्यांना अटक करण्यात आली. त्याच्याकडून इतर साथीदारांची नावे काढून घेऊन गुन्ह्याबाबत कबुली मिळवली आहे. पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह सहाय्यक पोलीस निरिक्षक स्वप्निल नाईक, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, नरेंद्र वारुळे, विजय पाटील, प्रितम पाटील, नितीन बाविस्कर, जयंत चौधरी, प्रदीप पाटील, नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी यांच्या पथकाने ही कारवाई करत दरोडा टाकणाऱ्यांना गजाआड केले.