पुणे | 3 मार्च 2024(राजमुद्रा)- : लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चाच सुरू आहे. या जागा वाटपाचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. जागा वाटपाचा फॉर्म्युलाही समोर आलेला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर प्रचंड नाराज झाले आहेत. या नाराजीतूनच त्यांनी वंचितच्या कार्यकर्त्यांनी आघाडीच्या कार्यक्रमांना, बैठकांना जाऊ नये असं आवाहन केलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. आंबेडकर यांच्या या विधानाने आघाडीचं टेन्शन वाढलं असून आता आघाडीच्या नेत्यांनी सारवासारव सुरू केली आहे.
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक व्हिडीओ व्हायरल करून हे आवाहन केलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत अजूनपर्यंत युती पूर्ण झालेली नाहीये. तेव्हा इतर पक्षांकडून पक्ष बैठक किंवा कार्यक्रमाला बोलावत असतील तर त्या बैठकी, कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू नये, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. तर प्रकाश आंबेडकर यांच्याकडून पुढील सूचना येईपर्यंत कोणीही आघाडीच्या बैठका आणि कार्यक्रमाला हजर राहू नये, असं वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी म्हटलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या या आवाहनानंतर महाविकास आघाडीचे नेते खडबडून जागे झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आंबेडकरांचे वक्तव्य मी ऐकलं. प्रत्येक पक्षाची एक शिस्त असते. आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे, त्यामुळे त्यांनी चुकीची भूमिका घेऊ नये. प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याकडे चुकीच्या अर्थाने पाहू नका. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते एक दिलाने काम करत आहेत. आमच्या पक्षातील लोकांना आणि इतर कोणालाही आदेशाची गरज नाही. राजकीय निर्णय होत असतात, जेव्हा होतील तेव्हा होतील, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.