जळगाव(राजमुद्रा): 4 मार्च 2024 नुकतंच जळगावमध्ये महासांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाला विशेष पाहुणी म्हणून ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूने हजेरी लावली होती. रिंकूची एक झलक पाहण्यासाठी जळगावकर उत्सुक झाले होते. त्यामुळे या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रम संपल्यानंतर रिंकू जेव्हा बाहेर जात होती, तेव्हा काही चाहत्यांनी धक्काबुक्की केली. गर्दीतून बाहेर पडताना रिंकूलाही एका चाहत्याचा धक्का लागला. त्यामुळे रिंकू चांगलीच भडकली होती. ‘या जागी तुमची मुलगी असती तर चाललं असतं का’, असा प्रश्न रिंकूने त्या चाहत्याला केला. रिंकूचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
जळगावमधील या कार्यक्रमात रिंकूने ‘सैराट’मधील तिचा लोकप्रिय डायलॉगसुद्धा म्हणून दाखवला होता. विशेष म्हणजे हा डायलॉग तिने खान्देशी भाषेत म्हणून दाखवला. यावेळी चाहत्यांनी एकच कल्ला केला. कार्यक्रम संपल्यानंतर तिथून बाहेर पडताना काही चाहत्यांनी गर्दीत धक्काबुक्की केली. त्यामुळे रिंकूचा राग अनावर झाला. या सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन शासनाकडून करण्यात आलं होतं. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर गर्दीवर नियंत्रण मिळवण्यास आयोजकांना काही प्रमाणात अपयश आल्याचं पहायला मिळालं
.