चाळीसगाव (राजमुद्रा)- संभाजी नगर येथून मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या बस ला कन्नड घाटाच्या पायथ्याशी अपघात झाला होता. सुदैवाने अपघातात जीवित हानी झाली नाही. सदर बस मध्ये बहुतांश मध्यप्रदेश येथील कष्टकरी मजूर वर्ग व त्यांची लहान मुले होती. अपघाताच्या ठिकाणाहुन त्यांना पोलीस दल व राज्य परिवहन महामंडळाच्या मदतीने चाळीसगाव येथे आणण्यात आले. मात्र यात बराच उशीर झाल्याने बस मधील प्रवाश्यांना विशेषतः लहान बाळांच्या खाण्यापिण्याचे हाल झाले होते. ही बाब पोलिसांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कार्यालयात कळवली असता तुम्ही त्यांना चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील नवीन कार्यालयात आणा आम्ही तोपर्यंत त्यांच्या जेवणाची व्यवस्था करतो असे कळविण्यात आले.
काही वेळाने सदर अपघातग्रस्त प्रवाश्यांनी भरलेली बस छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली तेव्हा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व आमदार कार्यालयातील कर्मचारी हे त्यांच्यासाठी जेवण घेऊन तयार होते. सर्व प्रवाशांना त्यांनी जेवण देत थोडा वेळ त्याठिकाणी आराम करू दिला व त्यानंतर त्यांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी एस.टी. बस ने धुळे रवाना केले.
परराज्यातील अनोळखी अपघात ग्रस्तांना तातडीने अपघातस्थळी मदत तसेच त्यांच्या जेवणाची व्यवस्था करून दिल्याने खऱ्या अर्थाने चाळीसगावकरांच्या माणुसकीचे दर्शन यानिमित्ताने घडले.