मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा । राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर आता राज्याचे ऊर्जामंत्री आणि काँग्रेसचे नेते नितीन राऊतही ईडीच्या रडारवर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकाराने काँग्रेसमध्ये मोठी राजकीय अस्वस्थता पसरली आहे. वाळू, कोळसा आणि जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी नितीन राऊत यांच्या विरोधात ईडी कडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. वकील तरुण परमार यांनी हि तक्रार दाखल केली असून त्यामुळे नितीन राऊत यांची ईडी कडून चौकशी होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
ऍड. तरुण परमार यांनी नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडी कडे तक्रार केली आहे. या दोषी नेत्यांवर अधिकाऱ्यांच्या संगनमताने वाळू,कोळसा व जमिनीत गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. परमार यांच्या या तक्रारीची गंभीरपणे दखल घेऊन ईडीने परमार यांना समन्स बजावून मुंबईला जबाब नोंदवण्यासाठी बोलावले होते. याप्रकरणी ईडीला पुरावा दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान त्यांच्याकडून येत्या ५ जुलै रोजी अधिक कागदपत्रे देण्यात येणार आहे.