शाहू महाराजांची विचारसरणी आणि त्यांचं कुटुंब चळवळीच्या जवळचं कुटुंब असल्याचं आम्ही मानतो. तीनही ठिकाणी निर्णय घेण्यात आलाय की, पक्षाच्या वतीने त्यांना आमचा पाठिंबा आहे. त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टीकोनातून जे प्रयत्न करावे लागतील ते सर्व प्रयत्न केले जातील”, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली
मुंबई (राजमुद्रा )- वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठी घोषणा केली. प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीसोबत एकत्र लढण्याचा निर्णय झालेला नाही. पण तरीसुद्धा त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली. काँग्रेसकडून कोल्हापूरच्या लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाची घोषणा केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केला आहे. “शाहू महाराजांची विचारसरणी आणि त्यांचं कुटुंब चळवळीच्या जवळचं कुटुंब असल्याचं आम्ही मानतो. तीनही ठिकाणी निर्णय घेण्यात आलाय की, पक्षाच्या वतीने त्यांना आमचा पाठिंबा आहे. त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टीकोनातून जे प्रयत्न करावे लागतील ते सर्व प्रयत्न केले जातील. मागे जे घडलं होतं ते यावेळेस न घडू देणं याची दक्षता सुद्धा घेण्यात येईल. कोल्हापुरात शाहू शहाजी छत्रपती यांचं नाव काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे”, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली.
“महाविकास आघाडीचं विचारणार असाल तर तो तिढा तुम्ही त्यांनाच विचारा. कारण आम्हाला त्याबाबत माहिती नाही. दुसरं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नवा पक्षा रजिस्टर केलाय. त्यांनी एक लिस्ट आमच्याकडे सादर केलीय. तेव्हा त्यांना आम्ही सांगितलंय की, आमचंच घोंगड भिजत पडलेलं आहे. ते मिटल्याशिवाय आम्ही आपल्याशी बोलू शकत नाही. किंवा निर्णय घेऊ शकत नाही. आमच्यात दीड तास चर्चा झाली. ते कोणते मतदारसंघासाठी इच्छुक आहेत याची माहिती आम्ही घेतली. पुढे चर्चा सुरु राहणार आहे”, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
‘महाविकास आघाडीचाच तिढा सुटलेला नाही’
“माझं म्हणणं असं आहे की, तुम्हाला आम्हाला सहकार्य केलं असतं तर कदाचित जे घोंगड भिजतयं ते भिजलं नसतं. तुम्ही सर्वांनी आम्हाला टारगेट केलं. म्हणून त्यांना त्यांचं कोंबडं झाकता आलं. त्यांचं कोंबडं आता बाग द्यायला लागलं आहे. 10 जागांवर शिवसेना आणि काँग्रेस यांचा दावा आहे. 5 जागांवर राष्ट्रवादी-शिवसेना आणि काँग्रेस असा वाद आहे. तुम्ही आम्हाला प्राधान्य दिलं असतं तिढा राहिला नसता. त्यांचंच भांडण मिटत नसेल तर आम्ही त्यामध्ये कुठे शिरायचं? त्यांच्यात आजही तिढा सुटला आहे, असं सांगण्यात आलेलं नाही”, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
‘आम्ही 26 तारखेपर्यंत थांबणार’
“त्यांचाच तिढा सुटणार नसेल तर आम्ही येऊन उपयोग आहे. आम्ही आजच सकाळी सांगितलंय. आम्ही 26 तारखेपर्यंत थांबणार. त्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडणार. आम्ही एक भूमिका मांडली आहे. काँग्रेस पक्ष ज्या सात जागा जिंकू शकतात, त्या जागा त्यांनी आम्हाला कळवाव्यात. आम्ही कुठे थांबलेलो नाहीत”, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
“आम्ही काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे दिल्लीतले नेते रमेश चेन्नीथला यांना पत्र लिहिलं आहे. तर राज्यातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहिलं आहे. त्यामुळे आम्ही अशी आशा करतोय की, काँग्रेसचं महाराष्ट्रातील कोणत्या सात जागांवर एकमत झालं तर चांगलं आहे. नाही झालं तर खर्गेंनी येऊन आम्हाला कळवावं, असं आम्ही त्यांना सांगितलं आहे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.