अमरावती (राजमुद्रा)- महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला एकीकडे ठरत नाहीय. तर दुसरीकडे अमरावतीत आमदार बच्चू कडू वेगळा विचार करण्याच्या तयारीत आहेत. बच्चू कडू हे सध्या महायुतीत आहेत. पण महायुतीत त्यांची नाराजी आहे. लोकसभेच्या जागावाटपात आपली भूमिका कुणीही विचारत नाही असं म्हणत बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर वक्तव्य केलं होतं. अमरावतीत महायुतीचा उमेदवार हा भाजपच्याच चिन्हावर लढेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. दुसरीकडे खासदार नवनीत राणा या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. या चर्चांनंतर बच्चू कडू यांना नवनीत राणा भाजपकडून उमेदवार असल्या तर तुम्ही पाठिंबा देणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट नाही शब्दात उत्तर दिलं. नवनीत राणा यांना उमेदवारी दिली तर आपण महायुतीतून बाहेर पडू, असा इशाराच त्यांनी देवून टाकला. त्यानंतर आज आणखी मोठी बातमी समोर येत आहे. बच्चू कडू अमरावतीतून वेगळा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत.
आमदार बच्चू कडू अमरावती लोकसभा मतदारसंघातून वेगळा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. येत्या 6 एप्रिलला प्रहार पक्षाचा उमेदवार अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करेल, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. लोकसभेला प्रहारचा उमेदवार द्यावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. बच्चू कडू यांनी याबाबत राज्मुद्राला प्रतिक्रिया दिली.
बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
“कार्यकर्ता डावलेला गेला आहे. त्याला आम्ही उमेदवारी देणार आहोत. आमचा उमेदवार एक ते दीड लाखाच्या फरकाने जिंकून येईल. आमचा कार्यकर्ता जाहीर केला तर त्याच्यावर वेगळ्या पक्षांकडून दबाव येऊ शकतो. त्यामुळे उमेदवार जाहीर करत नाही. पण 6 तारखेला आम्ही उमेदलारी अर्ज दाखल करणार आहोत”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
महायुतीच्या जागावाटपासाठी जोरदार हालचाली
बच्चू कडू यांनी अमरावतीत उमेदवार उभा करण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात अतिशय महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा सुरु आहे. जागावाटपावर आजच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.