मुंबई (राजमुद्रा )– लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षांकडून लोकसभेसाठी उमेदवारी यादी जाहीर केल्या जात आहेत. आता नुकतंच महायुतीची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत रासप नेते महादेव जानकर महायुतीमध्येच राहणार असल्याची मोठी घोषणा सुनील तटकरे यांनी केली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला एक जागा देणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे जोरदार तयारी करत होते. महादेव जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले होते. यानिमित्ताने महादेव जानकर यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. यावेळी शरद पवारांनी महाविकासआघाडीकडून त्यांच्यासाठी ही जागा सोडण्याची तयारी दर्शवली होती. पण आता महादेव जानकरांनी शरद पवारांना मोठा धक्का दिला आहे. आज झालेल्या महायुतीच्या बैठकीत महादेव जानकर यांना एक जागा देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
महायुतीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
मुंबईतील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह महादेव जानकर, सुनील तटकरे, प्रसाद लाड उपस्थित होते. या बैठकीनंतर सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महादेव जानकर यांना एक जागा देणार असल्याचे सांगितले.
महादेव जानकरांना मिळणार एक जागा – सुनिल तटकरे
“राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते अध्यक्ष महादेव जानकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक बैठक झाली. त्या बैठकीला महादेव जानकर उपस्थित होते. या बैठकीला प्रसाद लाड, सुनील तटकरेही उपस्थित होते. आम्ही सविस्तरपणे विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी महादेव जानकरांनी महायुतीसोबतच राहणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले. यावेळी महायुतीच्या मार्फत लोकसभेची एक जागा रासपला म्हणजेच जानकरांना देण्याचा निर्णय घेतला आहे”, असे सुनील तटकरे म्हणाले.
दोन-तीन दिवसात महायुतीचे जागावाटप जाहीर होणार
“योग्य वेळेला म्हणजेच येत्या दोन तीन दिवसात महायुतीचे जागावाटप जाहीर करु त्यावेळी त्यांना कोणता मतदारसंघ कोणती जागा यासंदर्भातील तपशील जाहीर केला जाईल. मला विश्वास आहे की जानकरांच्या या निर्णयामुळे महायुती आणखी बळकट होण्यात सहकार्य मिळले. तसेच राज्यभरातील 48 जागा महायुती लढणार आहे, त्यात आम्ही 45 + टार्गेट आम्ही ठेवले आहे. त्यातही त्यांचा सक्रीय सहभाग आणि फार मोठे योगदान जानकरांचे राहिलं, असा आम्हाला विश्वास आहे”, असेही सुनील तटकरे यांनी यावेळी म्हटले.