जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । राज्यात गाजलेल्या बहुचर्चित बीएचआर पतसंस्थेतील अवसायकाच्या काळातील घोटाळा प्रकरणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली होती. या गुन्ह्यात दाखल असलेल्या संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडीत असलेल्या ११ संशयित आरोपींपैकी ९ संशयितांनी पुणे न्यायालयात दिनांक २४ जून रोजी जामिन अर्ज दाखल केला होता. त्यावर सरकारी पक्षाने आज आपले म्हणणे सादर केले. त्यानुसार आता उद्या शुक्रवारी संशयित आरोपी जयश्री तोतला, जयश्री मणियार आणि भागवत भंगाळे या तिघांच्या अर्जावर पुन्हा सुनावणी होणार आहे. तर उर्वरित संशयितांच्या जामिन अर्जावर दि ५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
बीएचआर पतसंस्थेतील १२०० कोटीच्या घोटाळा प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन वेळा राज्यात छापेमारी करून संशयितांना अटक केली आहे. यातील दि १७ जून रोजी अटक केलेल्या ११ पैकी अंबादास मानकापे, जयश्री तोतला, प्रेम कोगटा, भागवत भंगाळे, छगन झाल्टे, जितेंद्र पाटील, जयश्री मणियार, संजय तोतला, प्रितेश जैन या नऊ संशयित आरोपींनी जमीन अर्ज दाखल केले होते. दरम्यान जयश्री तोतला आणि जयश्री मणियार या दोघान्चा अंतरिम जमीन अर्ज न्यायालयाने दि २५ जून रोजीच फेटाळून लावलेला आहे. आज सुनावणी दरम्यान सरकारी पक्षा तर्फे वकील प्रवीण चव्हाण यांनी युक्तिवाद करत सांगितले कि, गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने संशयितांना जामिन देण्यात येऊ नये अशी मागणी केली.