नवी दिल्ली ( राजमुद्रा):- लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना विचारणा केली असता, ‘मी लोकसभा निवडणुकीचे तिकीट नाकारले कारण माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच, सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणूक रोखे वटवले आहेत. त्यामुळे कोणालाच काहीही म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही, असेही त्या म्हणाल्या.
निवडणूक लढवण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे निवडणूक लढवण्याचा भाजपचा प्रस्ताव मी नाकारला, असे सीतारामण म्हणाल्या. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांना आंध्र प्रदेश अथवा तमिळनाडूतून निवडणूक लढवण्याचा पर्याय दिला होता. मात्र एक आठवडा किंवा १० दिवस विचार केल्यानंतर मी त्यांना नकार दिला. माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी तशा प्रकारचा पैसा नाही, असे त्या म्हणाल्या.
निवडणूक निधीसाठी चांगल्या यंत्रणेची आवश्यकता
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांची योजना रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी निधी जमा करण्यासाठी चांगली यंत्रणा आणण्याची तसेच त्यावर चर्चा करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच, हे निवडणूक रोखे तेव्हा प्रचलित कायद्यानुसार खरेदी केले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.