मुंबई(राजमुद्रा) :- भाजपचे नेते, खासदार उन्मेश पाटील हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. काही वेळा आधी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचीही भेट घेतली. त्यामुळे पाटील ठाकरे गटात येतील आणि जळगावमधून निवडणूक लढवतील, अशी माहिती आहे. त्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिलीय. उन्मेश पाटलांचं माहिती नाही. पण हेमंत गोडसे आमच्याकडे कमबॅक करतील. शिंदे गटाकडून उमेदवारी मिळणार नाही. म्हणून गोडसे आमच्यासोबत येतील. भाजप सर्वेचे कारण दाखवत जास्त जागा पदरात पाडून घेत आहेत, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
वंचितसोबतच्या आघाडीवर काय म्हणाल्या?
वंचितसोबतच्या आघाडीवर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिलीय. वंचितन आमच्यासोबत यावं, असं आम्हाला खूप आधीपासून वाटत होतं आणि आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्यासाठी प्रयत्न केले. जर आम्ही प्रकाश आंबेडकरांचा योग्य सन्मान केला नाही. तर मला भाजपच्या लोकांना विचारायचा आहे की अजितदादांचा पाच जागा देऊन काय सन्मान केला?, असं त्या म्हणाल्या आहेत.
शिवतारेंच्या भूमिकेवर प्रतिक्रिया
विजय शिवतारे यांनी आधी अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेतली. मात्र नंतर त्यांनी माघार घेतली. यावरही सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिलीय. तारे आता जमीन पर उतरले आहेत ,ते शिवसैनिक नाही तर भ्याड सैनिक, कारण शिवसैनिक 10 वेळा शब्द बदलत नाही किंवा दहा वेळा पक्ष बदलत नाही. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांना समोरासमोर उभा करून भाजप गलिच्छ राजकारण करत आहे कुटुंबात भाजपने फूट पाडली. लोकांनी अन्याय विरोधाची मशाल हातात घेतली आहे त्यामुळे विजयाची तुतारी नक्की वाजेल, असं त्या म्हणाल्या.
जागावाटपावर काय म्हणाल्या?
महाविकास आघाडीच्या जागावाटपावरही अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे. जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीकडे कुठलेही घोडं अडलं नाही. महाविकास आघाडीमध्ये सारं काही अलबेल आहे. मात्र महायुतीमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे. महायुतीमध्ये जागावाटप संदर्भात गोंधळ आहे. शिवसेनेची रणनीती तीच महाविकास आघाडीची रणनीती आणि महाविकास आघाडीचे रणनीती तीच शिवसेनेची रणनीती आहे. आम्ही सगळे एक दिलाने काम करत आहोत लोक या वेळेला भाजपला हरवाण्यासाठी मतदान करतील, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.