नागपूर (राजमुद्रा) : – जनता आता सुजाण झाली आहे. जनतेला सर्व गोष्टी कळलेल्या आहेत. एका व्यक्तीला वाचवण्यापेक्षा आज संविधान वाचवणं हे महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र हा शाहू, फुले, आंबेडकर विचारसरणीचा आहे. एका व्यक्तीचा नाही. शाहू, फुले, आंबेडकर विचारसरणी राज्यातल्या जनतेच्या हृदयामध्ये आणि डोक्यामध्ये बसलेली आहे. ज्या पद्धतीने या शाहू, फुले, आंबेडकर विचारसरणीला संपवण्याचं प्रयत्न काही लोक करतात आहे त्याला उत्तर आता लोक या निवडणुकीमध्ये देतील.
काँग्रेसमध्ये काय राहिलंय, असं म्हणत भाजप नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे. अशोक चव्हाण यांच्या या टीकेचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खरपूस समाचार घेतला आहे. अशोक चव्हाण यांना बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी काँग्रेसच्या नावावर खूप कमावलं आहे. त्यांनी राजयोग भोगला आहे. उलट काँग्रेसला संपवण्याचा अशोक चव्हाण यांनी प्लान केला होता, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नाना पटोले हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधतना भाजप नेते अशोक चव्हाण आणि वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली. अशोक चव्हाण यांना काँग्रेसवर बोलायचा आता अधिकार नाही. त्यांच्या भोकर विधानसभेत त्यांची काय अवस्था आहे? लोक त्यांना येऊ देत नाही ही अवस्था आपण बघत आहोत. त्यामुळं काँग्रेसवर बोलणं त्यांनी आता टाळावं. काँग्रेसच्या नावावर खूप कमविलं तुम्ही, काँग्रेसच्या नावानं खूप राजयोग भोगला. काँग्रेसला कसं संपवायचं याचा त्यांनी प्लॅन केला होता, बरं झालं आज ते आमच्यात नाही, असा टोला नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांना लगावला.
ज्या आईने नाव दिलं…
काँग्रेसवर बोलणं आता टाळलं पाहिजे. ज्या आईने तुम्हाला नाव दिलं, ज्या आईने तुम्हाला मोठं केलं, त्याचं आईची बदनामी करायला तुम्ही निघत असाल तर लोकं तुम्हाला माफ करणार नाही, असा हल्लाही पटोले यांनी चढवला.
आंबेडकर महान आहेत
यावेळी नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसला पाठिंबा देऊ, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. मात्र आम्ही महाविकास आघाडीत आहोत. त्यांना काही जाहीर करायचं असेल तर महाविकास आघाडीच्या अनुषंगाने जाहीर करायचं असतं. एखाद्या पक्षाबाबत भूमिका घेणं योग्य नाही. ते महान आहेत. त्यांच्याबद्दल फारसं काही बोलता येत नाही. परवा मी जाणार आहे अकोल्याला. या सर्वांचं वर्णन मी त्याठिकाणी करणार आहे, असं नाना म्हणाले.
त्यांनाच आघाडी नको होती…
आम्ही प्रकाश आंबेडकरांबरोबर चर्चेत पुढे गेलो होतो. मतांचं विभाजन होऊ नये असं वाटत होतं. पण त्यांनी आमची वारंवार चेष्टा केली. अडीच – तीन महिने तुमच्याच मीडियावर ती दाखवली होती. तरीही काँग्रेसच्या वतीने मी हायकमांडला समजून सांगितलं होतं. आम्ही पूर्ण तयारीने होतो. पण, त्यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रमध्ये उमेदवार उभे करायचं काम सुरू केलं, याचा अर्थ त्यांना मैत्री करायचीच नव्हती, हे त्याच्यातून सिद्ध होतं. त्यांनाच आघाडी नको होती, म्हणूनच त्यांनी उमेदवार जाहीर केले, असा दावाही त्यांनी केला.