राजमुद्रा:-. ज्काँग्रेसने आज आंध्रप्रदेश, बिहार, ओडिशा व पश्चिम बंगालमधील १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली असून यात आंध्रप्रदेशातील कडप्पा मतदारसंघातून आंध्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्ष वाय.एस. शर्मिला रेड्डी यांना उमेदवारी घोषित केली आहे.
काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. यात आंध्रप्रदेश व ओडिशाच्या लोकसभा आणि विधानसभा उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली. आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या कडप्पा या पारंपारिक मतदारसंघातून काँग्रेसने त्यांच्या कन्या वाय. एस. शर्मिला रेड्डी यांना उमेदवार घोषित केले आहे.
माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांना काकीनाडामधून उमेदवारी दिली आहे. खासदार महम्मद जावेद यांना बिहारमधील किशनगंज या मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी दिली आहे. कटिहारमधून माजी केंद्रीय मंत्री तारिक अन्वर तर भागलपूरमधून अजित शर्मा यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. ओडिशातील काँग्रेसचे एकमेव खासदार सप्तगिरी शंकर उलाका यांना पुन्हा कोरापूट येथूनच उमेदवारी दिली आहे. पश्चिम बंगालमधील सामाजिक कार्यकर्ते डॉ. मुनीश तमांग यांना दार्जिलिंगमधून उमेदवारी दिली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
आंध्रप्रदेश व ओडिशा विधानसभा
काँग्रेसने आंध्रप्रदेश व ओडिशाच्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आंध्रप्रदेशातील ११४ तर ओडिशातील ४८ उमेदवारांचा या यादीत समावेश आहे. या दोन्ही राज्यांमध्ये अनुक्रमे चौथ्या व पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.
बिहारमधील मुझफ्फरपूर येथील भाजपचे खासदार अजय निषाद यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सलग दोन निवडणुकांमध्ये अजय निषाद यांनी भाजपचे खासदार म्हणून निवडणूक जिंकली होती. परंतु यावेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांना काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला. आपण उमेदवारी मागण्यासाठी आलो नाही. काँग्रेस विचारांमुळे आपण राहुल गांधी यांनी भेट घेतली होती, असे ते म्हणाले होते.