हिंगोली (राजमुद्रा) :- महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार बदलण्यात आला आहे. शिवसेनेकडून हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पण हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजप आमदारांनी विरोध केला होता. अखेर भाजपच्या दबावानंतर हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. शिवसेनेकडून हेमंत पाटील यांच्याऐवजी आता बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हेमंत पाटील यांना भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी विरोध केला होता.
शिवसेनेच्या काही जागांचा तिढा अद्याप सुटला नसल्याची चर्चा सातत्याने सुरु आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी काल दिवसभरात प्रचंड बैठकांचं सत्र पार पडलं. शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी काल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकीसाठी गेल्या होत्या. हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर झालीय. पण हिंगोलीच्या भाजप आमदाराने त्यांच्या उमेदवारीला विरोध केलाय. त्यामुळे ते सु्द्धा चिंतेत आहेत. तर नाशिकच्या जागेवर आधी भाजप आणि आता राष्ट्रवादीने दावा सांगितल्यामुळे हेमंत गोडसे यांची धाकधूक वाढली होती.
तसेच गेल्या दोन वर्षांपूर्वी ईडीच्या ससेमिऱ्यात अडकलेल्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्याकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केला जातोय. हेमंत गोडसे हे आपल्याला शंभर टक्के उमेदवारी मिळेल, असा दावा करत आहेत. पण भावना गवळी यांच्याकडून तसा दावा केला जाताना दिसत नाही. याउलट त्यांच्याऐवजी मंत्री संजय राठोड यांना तिकीट दिलं जाईल, अशी चर्चा होती. अखेर हीच चर्चा खरी ठरण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.