जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । शासकीय गोदामातून आणलेला रेशनचा गहू व तांदुळाच्या २७२ गोन्या काळाबाजारात विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या दोन्ही स्वस्त धान्य दुकानदारांना एम आय डी सी पोलिसांनी गजाआड केले आहे. रेशन धान्याचा ट्रक आढळून आलेल्या तांबापुरा येथील बिलाल चौकातील रेशन दुकानाचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. पाळधी येथील रेशन दुकानदार शेख अन्वर उर्फ बबलू शेख गफ्फार आणि तांबापुरातील वार्ड क्र. ३८/१ मधील रेशन दुकान क्र. ६८ चा मालक शेख अहमद शेख निसार राहणार पाळधी यांना पोलिसांनी अटक केली आहे.
संशयितांना पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजार केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यासंदर्भात सांगितले कि, रेशनचे धान्य पकडण्याच्या प्रकरणात आलेल्या प्रस्तावानुसार कारवाई केली जाणार आहे. रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांची काहीतरी लिंक असण्याची शक्यता आहे. आता सार्वजनिक वितरण व्यवस्थेची लिंक शोधण्यात येईल असे त्यांनी सांगितले.