जळगाव (राजमुद्रा) : – जिल्ह्यात दहशत व बदला घेण्याचे राजकारण केले जात आहे. मात्र, आता शिवसैनिक हे खपवून घेणार नाहीत, असा इशारा भारतीय जनता पक्षातून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी खासदार उन्मेश पाटील यांनी दिला.
जळगावात ते पत्रकारांशी बोलत होते. मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर गुरुवारी (ता. ४) उन्मेश पाटील व करण पवार जळगावात दाखल झाले.
जळगाव रेल्वेस्थानकावर त्यांचे शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत केले. त्यांची रेल्वेस्थानकापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली. गोलाणी संकुलातील कार्यालयात ही मिरवणूक आली. तेथे शिवसैनिकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. जिल्हा संपर्कप्रमुक संजय सावंत, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, बाळासाहेब पवार, गजानन मालपुरे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे आदी उपस्थित होते.
उन्मेश पाटील म्हणाले, की आपण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेेनेची क्रांतीची मशाल हाती घेतली आहे. आम्ही पक्ष सोडून चूक केली, असे काही जण म्हणत आहेत.मात्र, आम्ही जळगावात येण्याअगोदरच उमेदवार बदलाबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे कुणी चूक केली, हे आता कळून येईल.
करण पवार म्हणाले, की शिवसेना ठाकरे गटातर्फे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील नेत्यांनी आपले अभिनंदन केले. गुरुवारी रेल्वेने आपण जळगावला येत असताना, चाळीसगाव, पाचोरा व जळगाव रेल्वेस्थानकावर आपले जल्लोषात स्वागत झाले. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची ताकद काय आहे, हे आपल्याला दिसून आले.