जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याची आरक्षण संबंधी प्रक्रिया सुरु झाली आहे. गट आणि गणाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच विविध राजकीय पक्षातून इच्छूक उमेदवारांच्या तयारीचे चित्र स्पष्ट होणार आहे. कारण जिल्हा परिषदेच्या होणाऱ्या संभाव्य निवडणुकीकडे राजकीय पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांचे लक्ष याकडे लागून आहे.
दरम्यान जि.प च्या गट व गणाची आरक्षण प्रक्रिया सुरु झाली असून संबंधित विभागाकडून याद्या मागवण्याची काम वेगाने सुरु झाले आहे. या निवडणुकीत जि.प व पंचायत समितीचे सत्तांतरण निश्चित मानले जात आहे. त्यादृष्टीने राजकीय पक्षातील इच्छुकांनी पडद्याआड आपली तयारी जोमाने सुरु केली आहे. आरक्षणाची प्रक्रिया सुरु झाल्या नंतर साधारण दिवाळीत नोव्हेम्बर नंतर निवडणुकीचे व उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. कारण काही गट व गणांच्या आरक्षणात कोणकोणते बदल होतात यावर राजकीय गणित अवलंबून आहे. अनेक गटात बदलाची शक्यता व्यक्त केली जात असून राखीव, ओबीसी किंवा खुले यावर अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आय, भाजप आणि इतर पक्षाने जि.प निवडणुकीची रणनीती तयार केली असून अनेक इच्छुक उमेदवार कामला लागले आहे. तसेच नुकतेच भुसावळचे प्रभारी माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केल्याने या पक्षाची ताकद देखील वाढली आहे. अनिल चौधरी यांनी राजकारणात राहून जिल्ह्यात युवकांची मोठी फळी निर्माण केली असून या फळीच्या माध्यमातून त्यांनी अनेक तालुक्यांमध्ये संघटन केले आहे. त्याचा फायदा जि.प व पं स च्या निवडणुकीत होणार असल्याचे संकेत मिळाले आहे. एवढेच नव्हे तर भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दाखल झालेले अनुभवी दिग्गज नेते एकनाथराव खडसे यांनी देखील जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी मोठी व्यूहरचना केली आहे. त्यांच्यामाध्यमातून सत्तांतर अटळ असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सेनेच्या माध्यमातून जिल्ह्यात जाळे निर्माण केले असून त्यांनी आखलेल्या रणनीतीमुळे सेनेचे वर्चस्व देखील दिसून येणार आहे. परंतु निवडणुकीत कोण बाजी मारतो सर्वाधिक इच्छुक उमेदवार कोणत्या पक्षात आहे याबाबी सर्व आरक्षणानंतर स्पष्ट होणार आहे. राज्याचे माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांची भूमिका देखील जि.प च्या निवडणुकीत मोलाची ठरणार आहे.