जळगाव (राजमुद्रा) : – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुढील 2 दिवसांत भाजपच्या आपल्या स्वगृही परतणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश जवळपास पक्का झाले आहे. पण त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या राजकीय भवितव्यावर घोडे अडले आहे, असा दावा केला जात आहे. या नव्या घटनाक्रमामुळे जळगाव राजकारण चांगलेच तापले आहे.
गत काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या कथित भाजप प्रवेशाची चर्चा रंगली आहे. त्यात खडसे यांच्या दिल्ली – मुंबई वारीमुळे या चर्चेला अधिकच खतपाणी मिळत आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, एकनाथ खडसे यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहिणे खडसे यांनी भाजपत प्रवेश केला, तर त्यांचे राजकीय भविष्य काय असेल? याविषयी दोन्ही बाजूने अद्याप मतैक्य झाले नाही. त्यामुळे खडसे यांचा भाजप प्रवेश रखडला आहे. पण खडसे अगोदर भाजप जातील, त्यानंतर काही दिवसांनी भवितव्याचा ठोकताळा निश्चित झाल्यानंतर रोहिणी यांचा भाजप प्रवेश होईल, असा दावा केला जात आहे.
शरद पवारांना विश्वासात घेणार
एकनाथ खडसे यांनी यासंबंधीचे कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी खडसे गुरुवारी रात्री रोहिणी यांच्यासह मुंबईला गेले होते. ते तिथे पवारांना विश्वासात आपल्या पुढील राजकीय पावलाची माहिती देणार होते. पण शरद पवार अचानक पुण्याला निघून गेल्यामुळे त्यांची त्यांच्याशी भेट होऊ शकली नाही. तत्पूर्वी, त्यांनी मुक्ताईनगरमध्ये आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांशीही चर्चा केली होती. पण पवारांची भेट झाली नसल्यामुळे त्यांची निराशा झाली. त्यामुळे शरद पवारांना विश्वासात घेईपर्यंत खडसे पक्षांतर करणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.
विधानपरिषदेवर खडसे ऐवजी रोहिणी यांना संधी?
उल्लेखनीय बाब म्हणजे एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेश केला तर त्यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा व त्या पक्षाकडून मिळालेल्या विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर त्या सदस्यत्वासाठी पुन्हा निवडणूक होईल. त्यावेळी भाजपचा उमेदवार कोण असेल? असा प्रश्न चर्चिला जात आहे. रोहिणी यांनी 4 वर्षांसाठी तिथे जावे आणि चंद्रकांत पाटलांनी विधानसभा लढवावी असा प्रस्ताव असल्याचे आणि तो रोहिणी यांना मान्य नसल्याचेही सुत्रांचे म्हणणे आहे. मग त्या जागी भाजपतर्फे कोण उमेदवार असेल? असाही प्रश्न या प्रकरणी उपस्थित केला जात आहे. त्यामुळे यासंबंधीच्या घटनाक्रमाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.