भुसावळ राजमुद्रा : भुसावळ केंद्र बिंदू असलेल्या रावेर लोकसभेत माजी आमदार संतोष चौधरींनी आपले राजकीय वलय जळगांव त्जिल्ह्यात राखून ठेवले आहे. अशातच रावेर लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात चौधरी उतरणार हे निश्चित असताना उमेदवारी साठी चुरस रंगायला सुरुवात झाली, चौधरी समर्थकांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच साहेबांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे भुसावळ शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन केले, मात्र अद्याप पर्यंत राष्ट्रवादीच्या उमेदवाराची घोषणा झालेली नाही. याचा फटका राष्ट्रवादीच्या लोकसभेच्या निकालावर बसण्याची देखील शक्यता आहे.
माजी मंत्री एकनाथ खडसेंना विश्वासात घेऊन उमेदवारी द्यायची असा विचार जरी पक्षश्रेष्ठी करीत असले तरी एकनाथ खडसे यांनी आज माध्यमांशी बोलताना ” होय मी भाजपात जाणार असे विधान केले आहे. खडसे कोणत्याही क्षणी निश्चित आहे भाजपमध्ये जाणार हे निश्चित आहे. विश्वासात घेतलेले खडसे राष्ट्रवादीसोबत किती काळ सोबत असणार याबाबत मात्र संभ्रम आहे, भाजप प्रवेशासाठी स्वतः खडसे देखील उत्साहीत असल्याचे सांगितले जात आहे. काहीही करायचे मात्र रावेर लोकसभेमध्ये सून असलेल्या रक्षा खडसेंना पुन्हा खासदार करायचे म्हणूनच खडसे हे पुन्हा भाजपमध्ये घर वापसी मुलीचे पुनर्वसन व सुनेला खासदार करण्यासाठीच आहे. मात्र पारिवारिक राजकीय जोडा-जोड करत असताना राष्ट्रवादी मात्र फाट्यावर मारली जात आहे. रावेर लोकसभा निवडणुकीमध्ये चौधरींना उमेदवारी मिळाल्यास राष्ट्रवादीला तगडी लढत देणारा उमेदवार म्हणून संतोष चौधरी यांच्याकडे बघितले जात आहे.
मात्र यामध्ये जी राष्ट्रवादी खडसेंना विश्वासात घेतल्याशिवाय उमेदवारी देऊ करत नाही, त्याच राष्ट्रवादीचा अभिमन्यू होतो की काय ? अशी परिस्थिती जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाची झालेली आहे. आणि जर खडसेंनी टाकलेला चक्रव्यूह जर भेदायचा असेल तर संतोष चौधरी एकमेव पर्याय म्हणून राष्ट्रवादी मधील पक्षश्रेष्ठींच्या पसंतीला येऊ शकतात. तशी गरज राष्ट्रवादी शरद पवार गटाची देखील आहे.
संतोष चौधरी हे भुसावळचे माजी आमदार आहेत, जनाधार आघाडीच्या माध्यमातुन त्यांनी आपला गड कायम राखला आहे. राष्ट्रवादीच्या संघर्षाच्या काळामध्ये अनेक नेते, पदाधिकारी पक्ष सोडून जात असताना दबंग नेतृत्व असलेल्या संतोष चौधरी यांना अनेक राजकीय पक्षांची ऑफर आली मात्र त्यांनी राष्ट्रवादी सोडण्यात खास करून शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहणार असल्याचे सुतवाच केले, राष्ट्रवादीचे दोन गट पडले तरी देखील राष्ट्रवादी सोडलेली नाही.
रावेर लोकसभा क्षेत्र हे महाविकास आघाडीच्या कोट्यातून राष्ट्रवादीला सोडण्यात आले मात्र उमेदवारी करणार कोण ? हा मोठा प्रश्न होता. राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी याबाबत एकनाथ खडसे यांच्यासह रवींद्र पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला होता, खडसे परिवारात निवडणूक रंगणार असे निश्चित असताना खडसे यांनी आपले वैद्यकीय कारण पुढे करून निवडणूक लढण्यास नकार दिला, सून विद्यमान भाजप खासदार रक्षा खडसे यांच्या सोबत संघर्ष करावा लागणार म्हणून रोहिणी खडसे यांच्या उमेदवारी बाबत नकार देण्यात आला. आता तेच खडसे कोणत्याही क्षणी भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीकडून उमेदवार द्यायचा तरी कोण ? हा मोठा पेच पक्षा समोर असताना संतोष चौधरी यांना रावेर लोकसभा लढवावी म्हणून विचारणा झाली संतोष चौधरी यांनी शरद पवार यांना पहिल्या शब्दात होकार देत निवडणूक लढण्याचा अंतिम शब्द दिला
मात्र चौधरी रिंगणात उतरल्यावर मातब्बर उमेदवार असल्याने तसेच चौधरींचे संघटन कौशल्य आणि मानणारा मोठा वर्ग यामुळे रावेर लोकसभेचा उमेदवार भाजपला बदलावा लागतो की काय ? अशी चर्चा सुरू झाली. कारण भाजपाच्या रक्षा खडसेंचा पराभव झाल्यास तो फक्त भाजपाचा पराभव नाही तर माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या सुनेचा पराभव म्हणून ओळखला जाईल तेव्हाच राष्ट्रवादीतल्या उमेदवारीवरून अंतर्गत कुरघोड्याना सुरुवात झाली.
अतिशय खडतड काळामध्ये आपले व पक्षांचे राजकीय अस्तित्व अबाधित ठेवणाऱ्या चौधरींना पुन्हा रावेर लोकसभेच्या उमेदवारीसाठी “वेट अँड वॉच” ची भूमिका घ्यावी लागत आहे. एवढेच नाही तर रावेर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारासाठी सर्वेक्षण करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
संतोष चौधरी यांना तापी खोऱ्यात मानणारा मोठा वर्ग आहे. रावेर लोकसभा बहुल जरी असला तरी मराठा, दलित आणि मुस्लिम हा वर्ग देखील लक्षणीय आहे. आणि ही मतं चौधरींच्या बाजूने देखील जाण्याची दाट शक्यता आहे. स्वतः राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी रावेर लोकसभा क्षेत्रात लक्ष घातले तर राष्ट्रवादीसाठी रावेर लोकसभा फायद्याची ठरणार आहे. रावेर लोकसभेमध्ये मराठा मुस्लिम दलित आणि इतर असा “फॅक्टर” चालला तर राष्ट्रवादीसाठी अनपेक्षित निकाल हाती लागण्याची शक्यता आहे. मात्र खडसे यांच्यासमोर चौधरी हेच टिकाव धरू शकतात हे तितकेच महत्त्वाचे आहे.
13 मार्च रोजी भाजपाच्या उमेदवार रक्षा खडसे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली, रक्षा खडसे यांचे दोन विधानसभा मतदारसंघात प्रचार पूर्णत्वास येत असून अद्याप पर्यंत राष्ट्रवादीने उमेदवार घोषित केलेला नाही. यामुळे आगामी काळात घोषित उमेदवाराची नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी चांगलीच तारांबळ उडणार आहे. एकनाथ खडसे जर भाजपमध्ये घरवापसी करीत असतील तर राष्ट्रवादी नेमका विश्वास कोणावर ठेवणार ? राष्ट्रवादी नेमकी कोणाला उमेदवारी देणार ? पक्ष नेतृत्वाच्या मर्जीत नेमकं कोणत्या नावाला पसंती आहे ? हे मात्र अधिकृत घोषणा झाल्यावरच राजकीय गणिते बदलणार आहे.