जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । महापालिकेच्या महत्वाच्या असलेल्या नगररचना विभागात सध्या बांधकाम परवानगी आणि भूसंपादन तथा आरक्षण जागे संबंधी प्रकरणाला ऊत आला असून या विभागात सक्षम अधिकारी नसल्याने सत्ताधारी शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी या विभागात आपले दुकान मांडणे सुरु केले आहे. खाऊगिरीच्या माध्यमातून लाखो करोडो रुपये उलाढालीचा गोरख धंदा काही नगरसेवकांनी सुरु केला आहे. त्यामुळे शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून पालिकेने आरक्षण व भूसंपादन केलेल्या जागेची सर्रास लूट सुरु आहे.
नगररचना विभाग नेहमीच चर्चेत राहिला असून तत्कालीन नगररचनाकार निकम असतांना या विभागात शहरातील काही बड्या उद्योगपती आणि बिल्डर्स चांगलाच धुमाकूळ केल्याचे सांगितले आहे. दरम्यान निकम यांच्या बदलीनंतर चांगला सक्षम कायमस्वरूपी अधिकारीवर्गाची वर्णी नसल्याने शहरातील शासनाच्या नियमानुसार बांधकाम व परवानगीसाठी सर्वसामान्यांचे हाल सुरु झाले आहे. तर पालिकेच्या काही अभियंत्यांच्या माध्यमातून नगररचना विभागातून कागदोपत्री फेरफार करण्याचे सत्र जोमाने सुरु आहे. याप्रकरणात सत्ताधारी म्हणून उदयास आलेल्या काही बड्या शिवसेना नगरसेवकांचा खुला आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे. तसेच माहीर असलेल्या भाजपातील काही नगरसेवकांचा यावर डोळा असून दररोज नगररचना विभागातून होणाऱ्या उलाढालीच्या प्रकरणात भाजपच्या काही तथाकथित नगरसेवकांचा संबंध असल्याचे समजते. भाजपमधील काही नगरसेवकांचे शहरातील मोठे बिल्डर्स आणि त्याच्या जवळचे यांच्या सोबत आर्थिक हितसंबंध असल्याचे दिसून आले आहे.