जळगाव (राजमुद्रा) : –जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मागील आर्थिक वर्षात (एप्रिल २०२३ ते मार्च २०२४) तब्बल बाराशे दोन बैठका घेतल्या. त्यातून जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून रखडलेले प्रश्न निकाली काढल्याचा दावा त्यांनी केला आहे.
जिल्हाधिकारी प्रसाद येथे २४ जुलै २०२३ ला रुजू झाले. तेव्हापासून ते लोकसभेची आचारसंहिता लागेपर्यंत त्यांनी सुमारे एक हजार १६ प्रशासकीय बैठका घेतल्या. त्यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी १८६ बैठका घेतल्या होत्या.
जिल्हाधिकारी जिल्हाचे प्रमुख असतात. त्यांच्या अधिपत्याखाली १४० समिती कार्यरत असतात. काही समितीच्या मासिक, साप्ताहिक, त्रैमासिक बैठका असतात. त्यात महत्त्वाची जिल्हा नियोजन समिती, पाणीटंचाई, महसूल वसुली, गौण खनिज, कृषी विभाग, आरोग्य विभाग, कायदा व सुव्यवस्था, लोकशाही दिन, महिला व बालकल्याण, समाज कल्याण, दिव्यांग, रेडक्रॉस सोसायटी, बँकांचे अधिकारी,जलसंपदा विभाग, महामार्ग प्राधिकरण आदी विभागांच्या बैठकांचा समावेश असतो. केंद्र, राज्य शासनाच्या विविध योजनांचा आढावा, अंमलबजावणी, नियोजन करून त्या योजना संबंधितांपर्यंत पोचतात किंवा नाही, पोचल्या तर लाभार्थ्यांच्या आयुष्यात काय बदल झाला? योजना संबंधितांपर्यंत पोचल्या नाही, तर त्याची कारणे, उपाय याही दृष्टीने विचाराबाबतचे नियोजन केले जाते.
बैठकांमधून अंमलबजावणी
या बैठकांमुळे जिल्ह्याचा विकासाच्या दृष्टीने विचार करून विकासाची दिशा ठरविली जाते. त्यादृष्टीने अंमलबजावणी करण्यास सांगितले जाते. शेळगाव बरेज प्रकल्पात पाणी साठविण्यासाठी नऊ एकर जमिनीची गरज होती. ती जमीन वन विभागाच्या अखत्यारित होती. दोन ते तीन वर्षे प्रयत्न करूनही वनजमीन जलसंपदा विभागाला मिळत नव्हती. श्री. प्रसाद यांनी मुंबई, दिल्ली, नागपूर आदी ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांसमोर प्रभावीपणे बाजू मांडून ती जमीन मिळवून दिली.
विमानतळाच्या धावपट्टीचा प्रश्न निकाली
जळगाव विमानतळाला रात्री उतरण्यासाठी जागा कमी पडत होती. जागेचे संपादन झाले असताना, नशिराबादचे शेतकरी ती जागा सोडण्यास तयार नव्हते. कारण ती जागा त्यांच्या शेतात जाण्यासाठी पूर्वीपासूनच रस्ता होता. शेतकऱ्यांना रस्त्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देत, शेतकऱ्यांची संमतीने विमानतळाच्या जागेचा रस्ता बंद करून दिला. यामुळे विमानतळाची धावपट्टी वाढली. रात्री जळगावला विमान उतरविणे सोईचे झाले.
लोकशाही दिनाच्या तक्रारींचा निपटारा
लोकशाही दिनात अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रकरणावर निकाल देत संबंधितांना न्याय मिळवून दिला. तरसोद ते फागणे महामार्ग चौपदरीकरणात येणाऱ्या अनेक अडचणी सोडवून महामार्गाच्या अधिकाऱ्यांना मार्ग लवकर तयार करण्यासाठी आदेश देण्यात आले.
सातपुडा पर्वतात असलेल्या पाल (ता. रावेर) असलेली वाघ, बिबट्या, हरिण, रानबगळे, ससा, मोर आदी प्राणी पाहण्यासाठी पर्यटकांसाठी ‘जंगल सफारी’ सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर करून, त्यासाठी निधीही मिळवून दिला आहे. अशी अनेक विकासात्मक कामे श्री. प्रसाद यांनी आर्थिक वर्षात केली आहेत.