भुसावळ (राजमुद्रा) : – रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे उद्योगपती श्रीराम पाटील यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी हे रावेर लोकसभेसाठी प्रबळ दावेदार असताना, पक्षाने ऐनवेळी पक्षात आलेले श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर दिल्याने स्थानिक एकनिष्ठ कार्यकर्ते नाराज झाले असून शेकडो पदाधिकार्यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले.यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भुसावळ राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी हे रावेर लोकसभेसाठी प्रबळ दावेदार असताना पक्षाने कुठलेही कारण न देता त्यांची उमेदवारी कापल्याने भुसावळसह मतदार संघातील कार्यकर्ते व पदाधिकारी संतप्त झाले आहेत. शुक्रवार, 12 रोजी 220 पदाधिकार्यांनी आपले राजीनामे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवत नाराजी व्यक्त केली. यावेळी बाळा सोनवणे, फिरोज शेख, बबलू खान, ऑऊं चौधरी, युवराज पाटील, गोकुळ राजपूत, सचिन पाटील, रणजीत चावरीया, देवेंद्र सपकाळे, रवींद्र भालेराव, राहुल बोरसे, सचिन अण्णा पाटील, अॅड.गौतम साळुंखे आदी उपस्थित होते.
दरम्यान, रावेर मतदारसंघात शरद पवार गटात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार संतोष चौकशी हे नाराज असून, अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. शिवाय, याबाबत माजी आमदार संतोष चौधरी हे सोमवारी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.