जळगाव राजमुद्रा :- जिल्ह्यातील दिव्यांग, ज्येष्ठ मतदार, गर्भवती महिला तसेच अपघात किंवा इतर कारणामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ज्यांना अडचण आहे अशा मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील केंद्रावर सुविधा
तसेच पोस्टल मतदानाची व्यवस्थाही निवडणुक विभागातर्फे करण्यात आल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. प्रत्येक मतदान केंद्रावर अशा मतदारांना प्राधान्याने प्रवेश देत त्यांना रांगेत थांबण्याची आवश्यकता नसते. व्हील चेअरची आवश्यकता आहे अशांसाठी सर्व मतदान केंद्रावर व्हील चेअरची व्यवस्था असेल.
तसेच रॅम्प उपलब्ध करून दिले जातील. त्याविषयीचा आढावा घेण्यात आला आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह तसेच मतदार सहाय्यता केंद्र या सर्व बाबी मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जर एखाद्या मतदारास मदतीची गरज असेल तर एनसीसी किंवा एनएसएसच्या विद्यार्थ्यांची मदत घेता येणार आहे.
दिव्यांग तसेच ज्येष्ठ मतदारांकडे प्रमाणपत्र आहे, अशा मतदारांना घरी पोस्टल मतदान करण्याची संधी देण्यात आहे. या अनुषंगाने ज्यांच्या वयाची ८५ वर्ष उलटली आहेत अशा ४५ हजार वृद्ध मतदारांकरिता घरी बसून मतदानाची सुविधा देण्यात येणार आहे. अशा मतदारांच्या घरी मतदान कर्मचारी स्वतः घरी जाऊन पोस्टल मतदान पद्धतीने त्यांचे मतदान नोंदवून घेणार आहेत.
बूथ स्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत हे अर्ज मागविण्यात आले होते. या मतदारांची १८ ते २२ या काळात पाहणी करून पोस्टल मतदान करून घेण्यात येणार आहे. तसेच यासाठी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये अंदाजे दोनशे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश राहील.
प्रतिक्षालयाची अभिनव संकल्पना
यावेळी मतदारांसाठी मतदान केंद्रावर प्रतिक्षालय उभारण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर एक खोली आरक्षित करून किंवा ज्या ठिकाणी खोली उपलब्ध नाही त्या ठिकाणी मंडप उभारून हे प्रतिक्षालय तयार करण्यात येणार आहे.
सावलीच्या ठिकाणी त्यांना बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि आवश्यक असल्यास प्रथमोपचार पेटी ठेवण्यात येणार आहे. जेणे करून गर्दी असेल तर मतदार थोडा वेळ विश्रांती घेऊ शकतील. मतदारांना रांगेत उभा राहून त्रास होऊ नये, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.