जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा| संपूर्ण देशभरात पोलिसांसोबत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काम करणाऱ्या महत्त्वपूर्ण आशेचा किरण म्हणजे होमगार्ड. होमगार्डचे महत्व कोविड -१९ काळात लक्षात आले असून पोलिसांची कुमक कमी पडली तेथे पोलिसांच्या बरोबरीने होमगार्ड दलाने जाऊन सेवा दिली आहे.
आज संपूर्ण जळगाव जिल्ह्यात २०४५ होमगार्ड आहेत. त्यात १८४२ पुरुष तर २०३ महिला होमगार्ड आहेत. त्यातील १६०० पेक्षा जास्त होमगार्ड प्रतिदिन कार्यरत असून पोलिसांच्या सोबत सेवा बजावीत आहेत. मात्र या सतत सेवा बजावणाऱ्या होमगार्ड बांधवांना जानेवारी महिन्यापासून म्हणजे गेल्या सहा ते सात महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने त्यांचे कुटुंबीय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत.
शासनाने वेळेवर मानधन देणे आवश्यक असताना त्यांना अद्यापही थकीत वेतन मिळालेले नसून, मंदीच्या काळातही मानधन न मिळाल्याने कित्येक होमगार्ड जवानांवर कर्ज काढून घर चालवण्याची वेळ आली आहे. या होमगार्ड जवानांना आंदोलन देखील करता येत नाही, ही मोठी दुर्दैवी बाब आहे. त्याही परिस्थितीत कुठेही सर्वसामान्य जनतेची गैरसोय होणार नाही, याचा विचार करून होमगार्ड जवानांकडून सेवेला प्राधान्य दिले जात आहे. राज्य शासनाने त्यांना जरी भत्ता जाहीर केला असला तरी, कोरोनाच्या काळात आलेल्या मंदीतही होमगार्ड जवानांचे मानधन थकीत असल्याने त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
धन्यवाद सर