नाशिक (राजमुद्रा) : – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी मतदान सुरु आहे. परंतु महाराष्ट्रात महायुतीमधील अनेक जागांवर वाद आहे. त्या जागांचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यात नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मुंबई येथील लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. नाशिकची जागा लढवण्यासंदर्भात छगन भुजबळ यांना केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी सांगितले होते. त्यानंतर भुजबळांनी तयारी सुरु केली होती. परंतु पक्षाकडून अधिकृत घोषणा झाली नाही. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधून भुजबळ यांनी लढावे, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदेश असल्याचे सांगितले. परंतु त्यानंतर छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय शुक्रवारी पत्रकार परिषद जाहीर केला. या जागेवर तिढा निर्माण झाल्यामुळे आपण माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
काय म्हणाले छगन भुजबळ
नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकच्या जागेसोबत अमित शाह यांच्यासोबत चर्चा झाली. अमित शाह यांनी नाशिकची जागा लढवण्याचे मला सांगितले. त्यावेळी ही जागा शिवसेनेकडे असल्याचे आम्ही सांगितले. त्यानंतर अमित शाह म्हणाले की, आम्ही एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत बोलू. त्यानंतर मी काम सुरु केले.
नाशिकमध्ये येऊन विविध घटकांशी चर्चा सुरु केली. मराठा समाज, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक विविध घटकांनी मला पाठिंबा दिला. परंतु यानंतर तीन आठवडे झाले आहेत. आता महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होऊन त्यांच्याकडून प्रचाराचा एक टप्पा पूर्ण झाला आहे. परंतु महाविकास आघाडीच्या चर्चेतून नाशिकचा प्रश्न सुटला नाही. यामुळे मी माघार घेत आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले होते…
नाशिकच्या जागेसाठी अजित पवार यांनी समीर भुजबळ यांचे नाव सुचवले होते. परंतु भाजप नेतृत्वाने मलाच निवडणूक लढवण्याचे सांगितले. मी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही तेच सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा निरोप आहे, तुम्हाला लढवावे लागणार आहे, असे त्यांनी सांगितल्याचे छगन भुजबळ म्हणाले. आता मी माघार घेत आहे. यामुळे या ठिकाणी तातडीने निर्णय घेतला पाहिजे. उगीच अडचण निर्माण होईल, असे होऊ नये, असे त्यांनी म्हटले.