जळगाव (राजमुद्रा) :- जळगाव तालुक्यातील नांदगाव शिवारातील शेत गट क्रमांक ३३ येथील गिरणा काठाजवळून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर जळगाव तालुका पोलीसांनी कारवाई केली असून चालका हा वाहन सोडून पसार झाल्याची घटना शनिवारी २७ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजता समोर आली आहे.
याप्रकरणी रात्री ११ वाजता तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील नांदगाव शिवारातील गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळूची मोठी वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती जळगाव तालुका पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आले. शनिवारी २७ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजता पोलीसांनी अवैधरित्या वाळूने भरलेले ट्रॅक्टरवर कारवाई केली. यावेळी पोलीसांना पाहून ट्रक्टरचालक हा ट्रॅक्टर घेवून पसार झाला. पोलीसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त केले आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता पोहेकॉ बापू पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण आगोणे हे करीत आहे.