जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | गेल्या पंचवीस वर्षापासून आपण शिवसेनेत आहेत, मात्र आता मी आमदार असूनही स्थानिक पातळीवर मला कोणत्याच गोष्टीसाठी विचारात घेतली जात नाही. आपण पक्ष सोडून जावे यासाठी आपल्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह स्थानिक नेते त्रास देत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार चिमणराव पाटील यांनी आज केला आहे. त्यांच्या आरोपांमुळे जिल्हा शिवसेनेत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत वादाला तोंड फुटले आहे.
शिवसेनेचे पारोळा आमदार व जिल्हा बँकेचे संचालक चिमणराव पाटील यांनी याबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले “पक्षात मला विनाकारण स्थानिक नेते त्रास देत आहेत. पक्षातून बाहेर जावे असे वातावरण निर्माण केले जात आहे. आता पक्षात नुकतेच नवीन जिल्हा प्रमुख यांची निवड झाली आहे. त्यात आपल्याला विचारण्यात देखील आले नाही.” असा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच शासकीय निधी वाटपात पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आपल्याला मुद्दाम टाळत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेत अंतर्गत गटबाजी असल्याचे उघडकीस आले.
यापूर्वी भाजपामध्ये माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्यात राजकीय हाडवैर होते हे सर्वश्रुत असताना, आता शिवसेनेत त्याची पुनरावृत्ती होत असल्याचे दिसून आले.