नाशिक (राजमुद्रा) : – शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांचा पत्ता कट होणार आहे. त्यांच्या ऐवजी ठाकरे गटाकडून संदीप गुळवे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. गुळवे यांचा थोड्याच वेळात ठाकरे गटात प्रवेश होणार असल्याचीही चर्चा आहे.
ठाकरे गटात मोठ्या घडामोडी… शिक्षक मतदारसंघासाठी विद्यमान आमदाराचा पत्ता कट; पक्षप्रवेश करताच ‘या’ नेत्याला उमेदवारी
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांचा पत्ता कट होणार आहे. त्यांच्या ऐवजी ठाकरे गटाकडून संदीप गुळवे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. गुळवे यांचा थोड्याच वेळात ठाकरे गटात प्रवेश होणार असल्याचीही चर्चा आहे.
एकीकडे आज लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान सुरू आहे. त्यानंतर संध्याकाळी एक्झिट पोल येणार आहेत. त्यामुळे देशात कुणाची सत्ता येणार याचा अंदाज येणार आहे. मात्र, त्यापूर्वीच महाराष्ट्रात ठाकरे गटात मोठ्या हालचाली होताना दिसत आहेत. या हालचालींचा लोकसभा निवडणुकीशी संबंध नाही. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीशी या घडामोडींचा संबंध आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गट आज एका विद्यमान आमदाराचा पत्ता कट करण्याची शक्यता आहे. तर पक्षात प्रवेश करणाऱ्या नेत्याला शिक्षक मतदारसंघाची संधी देणार असल्याचं सांगितलं जात आहे. थोड्याच वेळात या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश होणार असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महाविकास आघाडीकडून आतापर्यंत मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, नाशिक शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. महाविकास आघाडीकडून संदीप गुळवे यांना नाशिक शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. संदीप गुळवे हे आज ठाकरे गटात प्रवेश करतील. त्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर केली जाऊ शकते, असं सूत्रांनी सांगितलं.
दराडे मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात
किशोर दराडे हे नाशिक शिक्षक मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. दराडे हे ठाकरे गटात आहेत. मात्र, त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक वाढल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळेच दराडे यांना शिंदे गटाकडून नाशिक शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. दराडे हे शिंदे यांच्या संपर्कात असल्यानेच त्यांचा पत्ता कट करून उद्धव ठाकरे ही उमेदवारी संदीप गुळवे यांना देणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
कोकण पदवीधर काँग्रेसला?
कोकण पदवीधर मतदार संघावर महाविकास आघाडीत काँग्रेसने सुद्धा आपला दावा सांगितला आहे. काँग्रेस पक्षाकडून कोकण पदवीधर मतदारसंघाचे समन्वयक रमेश कीर यांचं नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे. नाशिक आणि मुंबई ठाकरे गट लढत असल्याने कोकण पदवीधर काँग्रेसला जाण्याची जास्त शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून कोकण पदवीधरसाठी किशोर जैन यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत असल्याने लवकरच या संदर्भात निर्णय होणार असून त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
विधान परिषदेच्या 4 मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार
1) अनिल परब मुंबई पदवीधर मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
2) जगन्नाथ मोहन अभ्यंकर मुंबई शिक्षक मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
3) संदिप गोपाळ गुळवे नाशिक शिक्षक मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
4) रमेश कीर काँग्रेस कोकण पदवीधर मतदारसंघ